रामाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सीतेने इथेच टाहो फोडला होता, कुठे आहे ती जागा, जिथं जगदंबेचा यात्रोत्सव भरलाय….
नाशिकच्या सरहद्दीत असलेल्या आणि प्रभू श्री राम आणि सीतामाईच्या संदर्भात अख्खायिका असलेल्या टाकाहारी मंदिराचा मोठा इतिहास आहे. याच गावात यात्रा भरली असून इतिहास जाणून घेण्यासाठी लोकं भेटी देतात.
नाशिक : महाराष्ट्रात जगभर प्रसिद्ध असलेली साडेतीन शक्तीपीठे ही मुख्य भक्तीची केंद्र म्हणून परिचित आहे. परंतु या भक्ती केंद्रांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रभर अनेक शक्तिपीठे आहेत. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाहाकारी या गावी वसलेलं मंदिर. श्री जगदंबा मातेचे शक्तिपीठ हे अतिशय भव्य दिव्य आणि प्राचीन आहे. रामायण कालखंडातील दंडकारण्याचा भाग असणारा हा परिसर असल्याचे सांगितलं जातं. त्यामुळे या गावाच्या नावाची उत्पत्ती ही थेट रामायणाशी जोडली जाते. पंचवटीतून रावण सीतामाईला पळवून घेऊन जात असताना सीतेने श्रीरामाच्या वियोगात याच ठिकाणी टाहो फोडला होता. म्हणून हे ठिकाण टाहोकरी आणि पुढे जाऊन ते टाहाकारी म्हणून ओळखले जाते.
टाकाहारी येथील शक्तिपीठाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील श्री जगदंबा देवीचे मंदिर हे संपूर्णपणे हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीतील मंदिर आजही अतिशय सुस्थितीत आहे. त्याशिवाय आणखीही बऱ्याच बाबीमुळे हे मंदिरं ओळखलं जातं.
महाराष्ट्रातील बहुसंख्य प्राचीन मंदिरे परकीय आक्रमणापासून वाचू शकले नाहीत परंतु टाहाकारी येथील हे मंदिर आजही प्राचीन वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना म्हणून दिमाखात उभा असल्याचं सांगितलं जातं.
जुन्या संशोधकांच्या संशोधनात या मंदिराला पूर्वी शिखर असल्याचा दावा केला जातो. मात्र सध्या मात्र मंदिराला उंच भव्य दिव्य घुमटाकृती पाच कळस शाबूत आहे. अखंड मंदिर हे 72 भव्य खांबांवरती तोललेले असून मंदिराच्या आतून व बाहेरून सुंदर असे नक्षीकाम केले आहे.
दरम्यान 12 ते 13 व्या शतकात बांधण्यात आलेले हे मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मंदिराचे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, मुख्य गर्भगृह, दोन उपगर्भगृहे असे भाग करण्यात आले आहे. मुख्य गर्भगृहात अंबिका मातेचे मूळ शक्ती केंद्र म्हणून तांदळा आहे.
मंदिर स्थापनेच्या नंतरच्या कालखंडामध्ये भक्तांकडून जगदंबा मातेची अतिशय भव्य दिव्य म्हणजेच सुमारे दहा फूट उंचीची अखंड काष्टातली महिषासुर मर्दानाचा देखावा असलेली काष्टमूर्ती गाभार्यात आहे.
नंतरच्या काळात मुखमंडपात नुकसान होत गेल्याने गावकऱ्यांनी मंदिराला आधुनिक पद्धतीने आधार दिला आहे. याशियाव इतर संपूर्ण मंदिराचे शिल्प जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे पुरातन वास्तू प्रेमींसाठी हे मंदिर एक अतिशय उत्तम वास्तुकलेचा नमुना आहे.
मंदिराभोवती अखंड भिंत आहे. ती संपूर्ण शिळांची पवळी आहे. सध्या मंदिराचे विकास काम हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने काम करण्यास अडचणी येतात.
मंदिर सुस्थितीत असतांनाही त्याकडे फार लक्ष दिले जात नाही. मोठा इतिहास असतांनाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. एरवी फार गर्दी नसली तरी याठिकाणी गावकरी दरवर्षी यात्रा भरवत असतात. सध्या इथे यात्रा सुरू आहे.
चैत्र पौर्णिमेला जगदंबा मातेची यात्रा भरवली जाते. आणि नवरात्रात मोठी गर्दी होते. या काळात येणाऱ्या भाविकांना इथे अन्नदानाची सोय गावकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक पासून जवळच असलेल्या हे मंदिर ऐतिहासिक असल्याने अभ्यासक भेटी देतात.