मंत्र्याच्या गाडीला कट मारून पळत होता, मंत्र्यासह पोलिसांनी पाठलाग केला; चौकशीत समोर आली धक्कादायक बाब, VIDEO व्हायरल
गेल्या काही महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर एका मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर आता पुन्हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये गंभीर बाब समोर आली आहे.
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका मंत्र्याने दारूच्या अड्ड्यावर छापा टाकत अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता, त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमात पाकीट मारी करणाऱ्या दोघांना पकडत कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल होता. हे सर्व ऐकून तुम्हाला जवळपास त्या मंत्र्याचं नावं कळालं असेलच. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बद्दलचे ते व्हिडिओ होते. आता पुन्हा एक व्हिडिओ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा व्हायरल झाला आहे. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गाडीला एका पीकअप वाहनाने कट मारला होता.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे मालेगाव दौऱ्यावर होते. त्याच दरम्यान त्यांच्या वाहनाला एका पीकअप गाडीने कट मारला होता. कट मारून त्या वाहनचालकाने पळ काढत गाडी जोरात पळवली होती. मात्र, त्याच वेळी दादा भुसे यांनी पोलिसांना त्या गाडीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले होते.
सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर पोलिसांनी पीकअप गाडी रोखली. त्यात मंत्री दादा भुसे यांनी त्याची कानउघडणी केली. याच वेळी त्याच्या गाडीची चौकशी करत असतांना धक्कादायक बाब समोर आली. अवैध रित्या गोवंश मांस वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
खरंतर दादा भुसे यांना गाडीने कट मारल्याने गाडी चालकावर संशय आला होता. पोलिसांचा ताफा असतांना कट मारण्याची इतकी हिंमत कशी काय झाली ? काही वेगळा कट आहे का? दारू पिऊन कुणी वाहन चालवत आहे का? असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित झाले होते.
मात्र, सिनेस्टाईल पाठलाग करत दादा भुसे यांनी चौकशी करत असतांना धक्कादायक बाब समोर आल्याने त्यांच्यासह असलेल्या पोलिसांनाही धक्का बसला. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहे.
खरंतर या घटनेनंतर जिल्ह्यातून गोवंश मांस वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले असून रात्रीच्या दरम्यान ही वाहतूक होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तर दुसरीकडे अवैध वाळू वाहतूक, लाकूड तस्करी आणि मांस वाहतूक केली जात आहे.
खरंतर ही संपूर्ण घटना गंभीर आहे. रात्रीच्या दरम्यान गस्त वाढवून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे थेट मंत्र्याच्या गाडीला कट मारला जात असेल तर अवैध वाहतुक करणाऱ्या चलकांची कुठवर मजल गेली आहे. याबाबत चर्चा होऊ लागली आहे.