मोठी बातमी! त्र्यंबकराजाच्या पेड दर्शनावर पुरातत्त्व विभागाचा आक्षेप, मंदिरातील गंभीर बाबींवर ठेवलं बोट
एकीकडे पेड दर्शनाचा मुद्दा न्यायालयात असतांना पुरातत्व विभागाकडे केलेल्या तक्रारीवरुन काही दिवसांपूर्वी एका पथकाने भेट देत पाहणी केली होती. त्यावरून देवस्थानला पत्र देण्यात आले आहे.
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणजे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर. दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मोठी वर्दळ त्र्यंबकेश्वर मध्ये पाहायला मिळत असते. याच दरम्यान लवकरात लवकर दर्शन व्हावे याकरिता पेड दर्शन ही सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण पेड दर्शनाचा पर्याय स्वीकारत होते. यावर आक्षेप घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर अद्याप निर्णय नसला तरी न्यायालयाने पेड दर्शन चुकीचे कसे आहे? यावर याचिका कर्त्यांना लिखित स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती.
एकीकडे पेड दर्शनाचा मुद्दा न्यायालयात असतांना पुरातत्व विभागाकडे केलेल्या तक्रारीवरुन काही दिवसांपूर्वी एका पथकाने भेट देत पाहणी केली होती. त्र्यंबकेश्वर मंदिरातील बहुतांश बाबींवर आक्षेप घेण्यात आला असून त्यामध्ये आर्थिक बाबींवरही पुरातत्व विभागाने बोट ठेवलं आहे.
राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने याबाबतचे पत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांना दिले आहे. यामध्ये देणग्या आणि आर्थिक व्यवहारावर आक्षेप घेत पेड दर्शनाच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे.
यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भविकांकडून पैसे घेतले जाते ते बंद करावे. त्यामध्ये पुरातत्व कायदा 1958 आणि त्याचा दुरुस्ती आणि प्रमाणीकरण कायदा 2010 च्या प्रमाणे सशुल्क दर्शनाला परवानगी नाही हा महत्वाचा आक्षेप घेण्यात आला आहे.
तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरातत्व विभागाचे दोन अधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिर पाहणीसाठी आले होते. त्यामध्ये डी एस दानवे आणि दीपक चौधरी या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. यांनी दिलेल्या अहवालावरुन हे पत्र अध्यक्षांना मिळाले आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांना स्वतः लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. यामध्ये पेड दर्शनाबरोबरच इतर बाबींवर ही पुरातत्व विभागाने बोट ठेवलं आहे. यामध्ये दान पेट्यांच्या बाबतही आक्षेप आहे. यामध्ये अनधिकृत दानपेट्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.
इतकंच काय संरक्षित क्षेत्रातून मोबाईल आणि वॉक वे हे काढून टाकावे असे नमूद करण्यात आले आहे. बेकायदेशीर ठेवलेल्या दानपेट्या काढून टाकाव्या अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. देणगी गोळा करण्यासाठी पोर्टेबल केबिन ठेवल्या आहेत त्या तात्काळ काढण्याच्या सूचना केल्या आहे.
उत्तर – पश्चिम कोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या वस्तु तात्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या आहे. यामध्ये अनेक वस्तु वापराविना पडल्या आहेत. त्यामुळे परिसराचे पावित्र्य आणि दृश्य खराब होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विविध बाबी राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने अधोरेखित करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे पेड दर्शन आणि आर्थिक बाबींवरच पुरातत्व विभागाने बोट ठेवलं आहे. त्यामुळे मोठा दणका देवस्थान समितीला बसला आहे.