शिवसेना फोडण्याचे काम पवारांनी नाही तर… छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, भुजबळांचे कुणाला प्रत्युत्तर?
भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या शरद पवार यांच्यावरील आरोपावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर देत हल्लाबोल केला आहे.
नाशिक : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना फुटीसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वादावर भाष्य केलं होतं. ‘त्या’ एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरू असून शिवसेनेच्या फुटीसाठी ही ते कारणीभूत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं असून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शरद पवार यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. शिवसेना फोडण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुम्हीच भांडण लावलं असा दावा करत भुजबळांनी पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे. याच निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ यांनी पवारांच्या दौऱ्याबद्दल माहिती देत असताना चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर देखील भाष्य केले आहे.
शरद पवार यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना फोडण्याचं खापर शरद पवारांवर फोडलं होतं. इतकंच काय दोन भावांमध्ये भांडण लावण्याचे काम देखील शरद पवारांनी केलं असा रोख चंद्रकांत पाटील यांचा होता. त्यालाच छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेना फुटली, या फुटी मागे कुणाचा हात आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडण लावलं, हे भांडण कोणी लावलं हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि असं काम शरद पवार करत नाहीत असा सज्जड दमच छगन भुजबळ यांनी भरलाय.
याच दरम्यान छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या दौरा बाबतची माहिती देत असताना नाशिक रोड येथील इंडियन प्रेस मजदूर संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे सांगितलं. याशिवाय देवळाली मतदारसंघातही काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे या दौऱ्यात निवडणुकीची कुठलीही चर्चा होणार नाही. याशिवाय हिंडेनबर्ग च्या बाबत शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार असल्याचेही या वेळेला छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. टाटा, बिर्ला यांनी देखील खूप चांगलं काम केले आहे. शरद पवार यांचे म्हणणे असं आहे की की उद्योगपतींच्या बाबत कुठपर्यंत आणून धरायचे? असं भुजबळ यांनी सांगितलं.
याशिवाय देशासह राज्यात इतरही अनेक मुद्दे आहेत. त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, ती होत नाही. मात्र काही लोकांना टार्गेट केलं जातंय. याबाबत दुमत असू शकेल पण हे कुणाला पटतं कुणाला नाही असं भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
एकूणच कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या भूमिकेच्या काही अंशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांनी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू असतांना छगन भुजबळ यांनी त्यावर भाष्य केले आहे. त्यामुळे आता यावर स्वतः शरद पवार काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.