नाशिकमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; नेमकी स्थिती काय?
नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनेक संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने चिंता वाढली आहे.
नाशिक : कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोरोनाचा नवा विषाणू देशात प्रसारित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही याबाबत सूचना दिल्या असून आरोग्य विभागाकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. असे असतांना मात्र आता कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा शिरकाव करत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नाशिक मध्ये रुग्ण संख्येत वाढ होत असतांना एकाच दिवसात 33 रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या 74 कोरोना बाधित रुग्ण असून 168 संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर सुरुवातीच्या काळात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे जिल्ह्यात तशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. ठिकठिकाणी आवाहन केले जात आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा सर्दी ताप जरी आला तरी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामध्ये आजार लपवू नका असे आवाहन केले जात आहे.
सर्दी, ताप आणि खोकला ही प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन स्वतः आरोग्यमंत्री यांच्यासह प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. कोरोना लक्षणे असल्यास कोरोनाची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत असून नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.
नाशिक शहरात सध्या 74 कोरोना बाधित रुग्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे प्रलंबित अहवाल देखील आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाकडून पुढील तयारी केली जात आहे.
नाशिकमध्ये कोविड वॉर्डसह, सीसीसी यांचा आढावा घेतला जात आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात बैठका आयोजित केल्या जात असून नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यासाठी सल्लामसलत केल जात आहे. त्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे.