औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, राज्यात जल्लोषही झाला, मात्र ‘या’ शहरात अजूनही दिशाफलक जैसे थे!
संपूर्ण राज्यात औरंगाबाद शहराचे नाव झाल्यानंतर तात्काळ बदल करत छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. यामध्ये काही शहरात अद्यापही औरंगाबाद असेच नाव असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले आहे. त्यानंतर ठीक-ठिकाणी औरंगाबाद शहराचे नाव पुसून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आला आहे. खरं म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजी नगर होताच राज्यात ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला होता. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे यांसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. औरंगाबाद शहरांचं नामांतरण झाल्यानंतर ठिकठिकाणी ढोल ताशे वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला होता.
मात्र, या घटनेला दोन महिने उलटून गेले तरी देखील नाशिक शहरातील औरंगाबाद शहराचं नाव तसंच असून सोशल मीडियासह विविध ठिकाणी नाशिक शहरात औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक शहरातील दिशा फलकावर अद्यापही छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करण्यात न आल्याने सोशल मीडियावर महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असं तातडीने करण्यात आलं आहे.
दरम्यान नाशिकमध्ये औरंगाबाद शहराचे नाव तसेच असून छत्रपती संभाजीनगर हे नाव रखडण्यामागील कारण काय ? जवळपास अद्यापही सर्वच दिशा फलकावर औरंगाबाद नाव तसेच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून टीका केली जात आहे. पालिकेला छत्रपती संभाजीनगर नावाचा विसर तर पडला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
खरंतर नाशिक वरून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारा विशेष मार्ग आहे. नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना बहुतांश ठिकाणी महानगर पालिकेच्या वतीने दिशा फलक लावण्यात आलेले आहेत. त्यावर विविध शहरांचे नाव नमूद करण्यात आले आहे.
मात्र, एखाद्या शहराचे नामांतर झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तात्काळ कार्यवाही करत त्यामध्ये बदल करणे अपेक्षित असतं. परंतु, नाशिक महानगर पालिकेला औरंगाबाद नावाचे आपल्या शहरात फलक आहे का? याबाबत माहिती नाही का? की विसर पडला ? अशी उलट सुलट चर्चा नाशिकमध्ये होऊ लागली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या ठक्कर बाजार येथून गडकरी चौक, सारडा सर्कल, द्वारका चौक, आडगाव रोड यांसह येवल्याकडे जाणाऱ्या अनेक ठिकाणी अद्यापही औरंगाबाद हेच नाव दिशाफलकावर आहे. त्यामुळे बरेच जाणारे येणारे नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.