अंजनीपुत्र हनुमान की जय…. घोषणांनी दुमदुमली अंजनेरी, हजारो भाविकांची गर्दी, इथेच जन्मले बजरंगबली, काय आहे इतिहास?
नाशिकच्या अंजनेरी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जात असून हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहे. हनुमान जन्मस्थळ असलेल्या अंजनेरीचा इतिहास यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

नाशिक : आज संपूर्ण देशभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. यामध्ये खरंतर हनुमानाला बऱ्याच नावाने ओळखलं जाते. त्यामध्ये अंजनीपुत्र, पवनपुत्र, बजरंगबली, मारुती आणि हनुमान अशा नावाने ओळख आहे. पहाटेपासून आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान भक्त मंदिरात दर्शनासाठी रांगा लावून आहे. बजरंग बली की जय अशा घोषणा घेत देत हनुमान मंदिरे दुमदुमून गेली आहे. त्यामध्ये जिथं हनुमानाचा जन्म झाला त्या अंजनेरीत हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहे. खरंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीला अंजनेरी येथे उत्साह पाहायला मिळत असतो त्यापेक्षाही यंदाच्या वर्षी अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.
खरंतर अंजनेरी पर्वतावर अंजनी मातेचे मंदिर आहे. तिथेच बाल हनुमानाची मूर्ती देखील आहे. मात्र, पर्वतावर जाणं अनेकांना शक्य नसल्याने अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाची भली मोठी मूर्ती आहे. त्यामुळे भाविक पायथ्याशीच दर्शन घेतात.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज अंजनेरी पर्वतावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हनुमान भक्तांचा ओघ इथे दिवसभर पाहायला मिळत आहे. हनुमानाचे जन्मस्थळ असल्याने भक्त विशेष करून भेट देत असतात.




अंजनेरीचा इतिहास काय?
हनुमान जन्मस्थळ म्हणून जरी अंजनेरीची ओळख असलेली तरी त्याचं वेगळं महत्व आणि तितकीच महती देखील आहे. त्र्यंबकेश्वरच्या पर्वत रांगेतील खरंतर एक पर्वत आहे. त्याच पर्वतावर अंजनी माता वास्तव्यास होत्या. तिथेच हनुमानाचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्या पर्वताला पुढे जाऊन अंजनीपर्वत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तेथील गावाचे नाव देखील अंजनेरी असे पडल्याचे सांगितले जाते.
हनुमानाचा जन्म आणि वाद-
राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासावर असतांना नाशिकमध्ये वास्तव्यास होते. त्याच दरम्यान जाणकारांच्या मते हनुमानाचा जन्म झाला होता. त्यानुसार जवळच असलेल्या अंजनी पर्वतावर जन्म झाला आहे असं अंजनेरी येथील गावकरी सांगतात. याशिवाय हनुमानाच्या जन्मस्थळावरून अनेकदा वादही झाला आहे. मात्र याबाबत शासकीय नोंदीत हनुमानाचे जन्मस्थळ हे नाशिक असल्याचे सांगितले जात आहे. तर काही ठिकाणच्या नागरिकांनी साधू यांनी देशातील अन्य ठिकाणी असल्याचा दावा केला होता. त्यावरून अद्यापही वाद सुरू आहे.
नाशिकपासून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असतांना अंजनेरी गाव लागते. तिथे गडाच्या पायथ्याशी एक 11 फुटांची मूर्ती साकारण्यात आली आहे. तिथेच लोक दर्शन घेत असतात. मात्र दुसरीकडे मंदिरासह अंजनी पर्वतावर अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत.
हा संपूर्ण परिसर प्राचीन आहे. ऐतिहासिक अनेक बाबी तिथे उपलब्ध आहेत. त्यामुळे आवर्जून पर्यटक देखील येत असतात. याशिवाय जाऊन मंदिर, मठ आणि धर्मशाळा देखील आहेत. इतिहासातील ध्यानमंदिर, तलाव आणि फैळखाना देखील असून इंग्रजांच्या काळातील हवा खाना देखील पाहायला मिळतात.