बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून 18 पिंजरे, सर्च ऑपरेशन सुरू; नरभक्षक बिबट्याला मारणार?
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी 18 पिंजरे लावण्यात आले असून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.
नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामध्ये नाशिकची ओळख ही लेपर्ड सिटी म्हणून होऊ लागली आहे. अशातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे एका बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल 18 पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून बसले आहे. अद्यावयत यंत्रणेच्या माध्यमातून बिबट्या कसा जेरबंद करता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये हा बिबट्या नरभक्षक असल्याचा मोठा संशय वनविभागाला आला आहे. त्यामुळे पिंजरे लावून बिबट्या जेरबंद झाला नाहीतर बेशुद्ध करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
याच बिबट्याने त्र्यंबकेश्वरच्या परिसरात दोन लहान मुलांवर हल्ला केला होता. दोन्ही घटना काही अंतरावर घडल्या आहे. एका चार वर्षाच्या मुलीला ओट्यावर जेवण करत असताना बिबट्याने हल्ला करून फस्त केले होते. त्यात मुलीचा मृत्यू झाला होता.
तर दुसरीकडे आई अंगणात बसून मुलीला दूध पाजत असतांना आईच्या मांडीवरुन बिबट्याने झडप घालून ओढून नेले होते. त्यात कमरे खालील भाग पूर्ण खाऊन घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
खरंतर हा संपूर्ण परिसर आदिवासी परिसर आहे. यामध्ये शेती आणि शेतमंजूरी करणारे लोक आहेत. त्यात वारंवार बिबट्या दिसून येत असतांना वनविभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असतांना वन विभागाने दुर्लक्ष केल्याने या घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता.
गेल्या काही दिवसापूर्वी या परिसरात बिबट्याचा हल्ल्यात 2 लहान मुलांचे मृत्यू झाल्याने वन विभागावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे परिसरात वन विभागाकडून तब्बल 18 पिंजरे लावण्यात आले आहे.
वनविभाग कडून बिबट्याला पकडण्यासाठी जोरदार सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री वनविभागाचे अनेक कर्मचारी आणि काही अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहे. 18 पिंजरे, अत्याधुनिक गन, कॅमेरे आणि इतर साहित्यासह कर्मचाऱ्यांकडून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
नरभक्षक झालेल्या बिबट्याला मारण्याची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक दिवस उलटून गेले बिबट्या हाती लागत नसल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचं टेंशन वाढलं आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना यश येते का बिबट्याला ठार केले जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.