किसान सभेच्या लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे? रूग्णालयाबाहेर आंदोलकांची गर्दी
नाशिकहून निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातीळ एका शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर रूग्णालयाच्या बाहेर आंदोलकांची मोठी गर्दी झालीय.
नाशिक : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक जाधव असं मृत्यू झालेल्या शेतकाऱ्याचं नाव असून ते नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावाचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आंदोलक शेतकऱ्यांनी शहापूर रुग्णालयात धाव घेतली असून मोठी गर्दी केली आहे. पुंडलिक जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लाँग मार्चमध्ये पायी चालत असतांना शेतकऱ्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकहून निघालेले हे लाल वादळ ठाण्यात जाऊन पोहचले आहे. शहापूर हद्दीत असतांना मोर्चातील पुंडलिक जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
किसान सभेच्या माध्यमातून सुरू झालेले हे आंदोलन आता शेतकऱ्याच्या मृत्यूने चिघळण्याची शक्यता आहे. ठाण्यातील शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
काल रात्री त्यांचा मृत्यू झाला असून रात्रीपासून शेतकरी तिथे जमू लागले आहे. रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी असून सरकारच्या विरोधात आणखी हे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोर्चाचे नेतृत्व करीत असलेले जे पी गावीत, डॉ. अजित नवले यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली होती. मृत्यूचे कारण विचारण्यात आले मात्र त्याबाबत उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे.
वन जमिनी नावावर करण्यासह जवळपास 14 मागण्या घेऊन हे शेतकरी थेट विधानभवनावर कूच करीत आहे. तळपत्या उन्हाची तमा न बाळगता आणि भर पावसात कसलाही विचार न करता हे आदिवासी शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहे.
याच दरम्यान आपल्या मागणीसाठी चालत असतांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. आंदोलकांच्या मध्ये खळबळ उडाली आहे. मोर्चाचे नेतृत्व करणारे नेते आंदोलकांना शांत करण्याचे काम करीत आहे.
तर दुसऱ्याबाजूला गेल्या दोन दिवसांपासून आदिवासी शेतकऱ्यांच्यासोबत सरकार चर्चा करत आहे. मात्र, कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप दिलासा नाहीये. काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी जो पर्यन्त अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे.