नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द दिला आहे. यामध्ये दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच दिलीप दातीर यांच्या राजीनाम्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दिलीप दातीर यांनी 2019 मध्ये पश्चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीचे तिकीट नाकारल्याने दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर दिलीप दातीर यांच्यावर नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून मनसेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर दिलीप दातीर यांच्याकडे शहाराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज त्यांनी त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला असून तो मंजूर करावा म्हणून विनंती केली आहे.
दिलीप दातीर यांनी यावेळेला राजीनामा देत असतांना दिलेल्या जबाबदाऱ्यांच्या बद्दल आभार मानले आहे. दिलीप दातीर यांनी राजीनाम्या देण्यामागील कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. मात्र, राजीनामा देण्याची प्रक्रिया गुप्त असल्याने फोटो व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना न्याय देण्यात मी कमी पडत असल्याचे त्यात म्हंटलं आहे. याशिवाय महाराष्ट्र सैनिक म्हणून मी कायम बांधील राहील असेही दिलीप दातीर यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे दिलीप दातीर हे मनसेत राहणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
मात्र, दुसरीकडे आगामी काळातील निवडणुका आणि पालिकेतील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहे. त्यामुळे दातीर यांना थेट पक्षालाच सोडचिठ्ठी तर द्यायची नाही ना? असेही बोलले जात आहे.
दरम्यान, दिलीप दातीर यांनी हा राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठविला असला तरी अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचीही चर्चा मनसे वर्तुळात सुरू असून याचं खरं कारण अद्याप तरी समोर आले नसून याचं स्पष्टीकरण काळच ठरवेल.
खरंतर दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फारसा कुणी मोठ्या नेत्याने प्रवेश मनसेत केला नव्हता, तर पक्षात असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षाची वाट धरली होती. त्यामुळे दातीर यांचा राजीनामा कशामुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.