हे गाव लईच भारी! गावानं घेतलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा; दारू पिऊन चुकूनही या गावात जाऊ नका, नाहीतर…
नाशिकमधील आणखी एक गाव अनोख्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे. गावातील महिलानी एकत्र येत घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. महिलांनी घेतलेला निर्णय काय आहे हे जाणून घ्या.
नाशिक : काही गावं ही अचानक चर्चेत येत असतात. त्याचे कारण म्हणजे एखाद्या वेगळ्या घटनेने किंवा काही तरी अनोखा निर्णय घेतल्याने. नुकताच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील गावकऱ्यांनी गाव विकणे आहे म्हणून ठराव केला होता. म्हणूनच संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. असे असतांना नाशिक जिल्ह्यातील दुसरे एक गाव चर्चेत आले आहे. यामध्ये गावातील महिलांनी एकत्र येऊन एक अनोखा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे यापूर्वीच संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र, नुकताच एक अनोखा निर्णय घेतल्याने गाव पुन्हा चर्चेत आले आहे.
खवा निर्मिती बरोबरच साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या वणी गड आणि ऐतिहासिक अहिवंत किल्ल्याचा पायथ्याशी वसलेले दरेगाव वणी या गावाने मोठा निर्णय घेतला आहे. गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंद व्हावी यासाठी गावात रणरागिणींचा एल्गार पाहायला मिळाला आहे.
दरेगाव वणी गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. संपूर्ण गावाने हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. आणि ही अंमलबजावणी स्वतः गावातील महिलांनी हाती घेतली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास महिला चोप देणार आहे.
हे गाव संपूर्ण आदिवासी भागात आहे. गावात 80 टक्के आदीवासी समाज आहे. गावातील लोक शेती आणि शेतीमंजूरी करतात. याशिवाय शेतीवर अवलंबून असलेले काही व्यवसाय करतात. त्यामुळे कष्टकरी लोकं असल्याने अनेक जण व्यसनाच्या आहारी गेले आहे. त्यामुळेच हा कठोर निर्णय गावातील महिलांनी हाती घेतला आहे.
विशेष म्हणजे हे सप्तशृंग गडाच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकविण्याचा मान याच गावातील कुटुंबाला आहे. शेकडो वर्षाची परंपरा हे गाव जपत आले आहे. त्यामुळे दरवर्षी चर्चेत येणारे दरेगाव वणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दारूबंदीच्या दृष्टीने महिलांनी हा ठराव केला आहे.
दारूमुळे या गावातील काही महिला विधवा झाल्या आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागल्याने दारू बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच काय दारू प्यायलाच मनाई करण्यात आली आहे. दारू पिऊन गावात आल्यास दंडाची कारवाई केली जाणार असल्याने आणि महिलांच्या हातून प्रसादही मिळणार असल्याने या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे.
गावातील महिलांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, त्यानंतर महिलांच्या निर्णयाला संपूर्ण गावातील पुरुषांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये दंडाची रक्कमही गावातील समस्या सोडविण्यासाठी वापरली जाणार आहे. तंटामुक्तीच्या माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.