चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, नाशिक | 24 डिसेंबर 2023 : सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो दाखवत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. व्यंकटेश मोरे यांनी पार्टीचं आयोजन केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कु्त्ता याच्यासोबत पार्टीत नाचतानाचा व्हीडिओ भाजपकडून दाखवण्यात आला. नितेश राणे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले. मात्र ही पार्टी भाजपच्या नेत्याने आयोजित केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. संजय राऊतांनी थेट पुरावे दाखवत पलटवार केलाय.
ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण दिलं होतं. सलीम कुत्ताला संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता, बॉम्बस्फोटमधला तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडलं. याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आजही व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल, तर आपली परंपरा आहे जाणे, बसणं चर्चा करणं. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतः कडे बघावं, असं राऊत म्हणाले.
व्यंकटेश मोरे कारवाईची मागणी करणार का? असा प्रश्न विचारला. तेव्हा व्यंकटेश मोरेबाबत मी काहीही मागणी करणार नाही. मोरेचे फोटो मी दाखवला. बडगुजर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा बुरखा कसा फाटका आहे, हे मी दाखवलं आहे, असं राऊत म्हणाले.
23 जानेवारीला नाशिकला महाशिबिर आणि खुले अधिवेशन हुतात्मा कान्हेरे मैदानावर होईल. महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा दृष्टीने रणशिंग फुंकायचं आहे. ते श्रीरामाच्या भूमीतून फुंकले जावं. अशी उद्धव ठाकरेंची श्रद्धा आणि भावना आहे. त्याची सुरुवात पंचवटीतून लढाईला सुरुवात होईल, असंही राऊतांनी सांगितलं.