चिखलफेकीचा उत्साह पाहिलाय का? चक्क हजारो नागरिकांनी चिखलाने अंघोळ करत आनंद लुटला…
खरंतर राजकारणात एकमेकांच्या अंगावर चिखलफेक केली असा एक वाक्प्रचार आहे. अलिकडच्या काळात सर्रासपणे वापरला जात असला तरी दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये प्रत्यक्षात चिखलफेक करण्यात आली आहे.
नाशिक : शॉवरने आंघोळ, स्विमिंगपूलमध्ये अंगोळ किंवा टबमध्ये अंघोळ करण्याचा अनुभव घेतला असेल. पण नुकताच नाशिकमध्ये एक उत्सव पार पडलाय. त्याचा आनंद हजारो नागरिकांनी घेतला असून मुंबई पुण्यासह इतर शहरातील नागरिकही त्यामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ही अंघोळ चिखलाने केली जाते. एकमेकांच्या अंगावर चिखलफेक केला जातो. मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा उत्सव साजरा करण्यासाठी विशेष टबची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामुळे अनोखा आनंद या चिखलफेक मध्ये येत असतो. या उत्सवात अनेक अधिकारी, राजकीय नेते यांसह उद्योजक सहभागी झाले होते.
असा पार पडला मडबाथ उत्सव – सालाबादाप्रमाणे यंडच्या वर्षी चामरलेण्यांच्या पायथ्याशी मडबाथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. याला मातीचे स्नान म्हणूनही संबोधले जाते. हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. 25 फुट लांबीचा टब यावेळेला तयार करण्यात आला होता. त्यातमध्ये एकमेकांच्या अंगाला चिखल लावण्यात आला होता. त्यानंतर उन्हात वाळत उभे राहिले. संपूर्ण चिखल वाळल्यानंतर शॉवर खाली उभे राहिले. यावेळेला डिजेही लावण्यात आल्याने नागरिकांनी ठेका धरला होता.
कशी असते मडबाथची तयारी – महिनाभर अगोदरच या उत्सवाची तयारी सुरू होत असते. उन्हाळ्यात या उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये जी माती वापरली जाते ती वारुळाची माती वापरले जाते. आठ दिवस ही माती पाण्यात भिजवली जाते. आणि त्यानंतर वापरली जाते.
खरंतर राजकारणात अनेक नेते एकमेकांवर चिखलफेक करतात असं आपण सहजरित्या बोलत असतो. मात्र, नाशिकमधील हा अनोखा फेस्टिवल प्रत्यक्षात चिखलफेक करूनच साजरा होत असतो. या चिखलफेकीत राग आणि कटुता नाही. उलट यामध्ये आनंद आहे.
दरवर्षी या उत्साहाचा प्रतिसाद वाढता आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे कित्येक तास चालणारा हा फेस्टिवल आहे. त्यामध्ये मडबाथ नंतर मिसळपार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आणखी एक आनंद यावेळेला नाशिककरांनी लुटला.
नाशिक मधील हा मडबाथ उत्सव आनंद देणारा असला तरी यामागील आणखी एक कारण आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते त्यामुळे नागरिक मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात. त्यातच सुट्टीचा दिवस पाहूनच हा उत्सव केला जात असल्याने मोठी धमाल यावेळेला पाहायला मिळते.