राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची गांधीगिरी, सह्यांची मोहीम आणि पोस्टकार्ड अभियान, नेमकं काय करताय?
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक मधील युवक काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी करत अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. युवक कॉंग्रेसकडून भाजपवर एकप्रकारे हल्लाबोल केला जात आहे.
चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नाशिक शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात आली. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याचा निषेध म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. नाशिकच्या कॉलेज रोडवरील भोसला सर्कल येथे युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. तसेच देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यावर जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक मधून पाच हजार पोस्टकार्ड पाठवले जाणार आहे. विरोधी पक्ष संपवण्याची सुडबुद्धी या देशात सुरू असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी मोदी या आडनावावरून कर्नाटक येथे टीका केली होती. त्यावरून सुरत मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला सुरू होता.
नुकताच त्याबाबत सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाचा शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे.
तर दुसरीकडे मात्र या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष यांच्याकडून राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द केले आहे. त्यावरून संपूर्ण देशासह राज्यामध्ये राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलने केली जाते आहे.
त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक मध्ये सह्यांची मोहीम आणि पोस्टकार्ड अभियान सुरू केले आहे. जवळपास पाच हजार पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक युवक काँग्रेसच्या वतीने पाठविले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याशिवाय महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत असतांना जहरी टीका केली आहे.
याच दरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही सवाल उपस्थित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अडाणी बरोबरचे संबंध काय आहेत याबाबतही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे.
युवकांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून एक प्रकारे काँग्रेसच्या वतीने ही गांधीगिरी केली जात आहे.