‘या’ मार्गावरून साई बाबांच्या दर्शनाला जाताना टोल भरावा लागणार, आजपासून टोलवसूलीला सुरूवात
नाशिक पासून अवघ्या काही अंतरावर शिंदे पळसे टोल नाका असतांना पुढे पुन्हा शिर्डी महामार्गावर टोल सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक : संपूर्ण देशात 1 एप्रिल पासून टोलवसूली नव्या स्वरूपात होत आहे. अनेक ठिकाणी टोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी नव्याने टोल सुरू झाले आहे. त्यामुळे बहुतांश जणांना टोलबाबत माहिती नसल्याने बऱ्याच ठिकाणी गोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोलवरील वाद दिवसेंदिवस वाढत असतांना आता तुम्ही देवदर्शनाचा विचार करत असतांना साई बाबांच्या दर्शनाला जाणार असाल तर आणखी एका टोलची भर पडणार आहे. यामध्ये नाशिकच्या सिन्नर ते शिर्डी महामार्गावर टोल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरवाडी येथील टोल प्लाझा सुरू झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च आता वाढणार आहे.
पिंपरवाडी येथील टोल सुरू करत असतांना काही सूट देण्यात आली आहे. यामध्ये अव्यावसायिक वाहनांना 330 रुपयांचा पास घ्यावा लागणार आहे. टोल सवलतीसाठी स्थानिक नागरिकांना टोल कार्यालयात कागदपत्रे देऊन नोंद करावी लागणार आहे.
यामध्ये टोल वसूल करण्यासाठी सरकारची नवी प्रणाली म्हणजेच फास्टॅगच्या माध्यमातून केला जाणार आहे. कार, जीप आणि व्हॅनसाठी एका बाजूने 75 शुल्क आकारले जाणार आहे. त्यामध्ये मिनीबस आणि एलसिव्ही आणि एलजिव्ही वाहनांसाठी 125 आणि त्यानंतर इतर मोठ्या वाहनांसाठी 260 पासून 500 रुपये पर्यन्त शुल्क आकारले जाणार आहे.
यामध्ये दैनंदिन प्रवासासाठी जिल्ह्यातील नागरिकांना काही सूट देण्याचा निर्णय इतर टोल प्लाझा प्रमाणे देण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिकांना ही सूट देण्यात येणार आहे. यामध्ये एकेरी आणि दुहेरी असा प्रवासानुसार दर ठरविण्यात आले आहे.
नाशिक आणि मुंबई च्या दिशेने जाणारे नागरिक हे सिन्नर मार्गे शिर्डीला जातात. त्यांच्या करिता हा टोल प्लाझाचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे. तर नाशिकच्या दिशेने शिर्डीवरून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे.
या टोलमुळे सिन्नर ते शिर्डी हा महामार्ग सुस्थितीत राहील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून अनेक प्रवासी या महामार्गाची स्थिती पाहून संताप व्यक्त करत होते. नंतरच्या काळात रस्त्याचे काम होऊनही अपघात कायम होत होते. त्यामुळे नेहमीच हा महामार्ग चर्चेत असतो.
खरंतर काही अंतरावर सिन्नरच्या अलीकडे शिंदे पळसे टोल आहे. त्यामुळे येथे आकारणी केली तर पुढे जाऊन पुन्हा पिंपरवाडी येथेही आकारणी होणार असल्याने वाहनधारक यांचा संताप होण्याची शक्यता असून याबाबत कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाहीये.