डिग्रीचा विषय पेटलाय तर हेही वाचूनच घ्या, जेलमध्ये पदवी घेतली तर काय सवलत?
कारागृहातील जवळपास 109 कैदी आत्ता शिक्षण घेत असून आयआयटीच्या माध्यमातून 120 कैद्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कोर्समध्येही कैद्यांनी सहभाग नोंदविला आहे.
नाशिक : जीवन जगत असतांना रागाच्या भरात एखादा गुन्हा घडल्यानंतर तुरुंगवास भोगण्याची वेळ येते. त्यात अनेक वर्षे तुरुंगात राहण्याची वेळ आल्याने अनेकांचे शिक्षणाचे वय देखील निघून जात असते. त्याच पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासन आणि काही विद्यापीठांकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे डिग्री पूर्ण केल्यास शिक्षेत सूट देखील मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाच्या वतीने कैद्यांचे अपूर्ण शिक्षण पुनर करण्यासाठी अभिनव प्रयोग राबविला जाणार आहे. कारागृहात स्थापन केलेल्या संगणक कक्षात 120 कैदी मुंबई आयआयटी शिक्षणाचे धडे देणार आहे. एकूणच शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन कैद्यांना शिक्षण देण्याचे प्रयोग केला जात आहे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं म्हंटलं गेलंय, त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण किती महत्वाचे आहे याची प्रचिती अनेकदा आली आहे. त्यामध्ये समाजात वावरत असतांना असलेले ज्ञान आणि नोकरीसाठी शिक्षण महत्वाचे आहे.
नाशिकच्या जेलरोड येथील कारागृहातील कैद्यांसाठी राबविण्यात येणारा शिक्षण उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामध्ये ज्या कैद्यांचे शिक्षण अपूर्ण आहे त्यांना हे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षा संपल्यानंतर त्यांना या शिक्षणाचा फायदा होणार आहे.
खरंतर शिक्षा पूर्ण झाली की कैदी बाहेर पडल्यावर काय व्यवसाय करणार? कुठे नोकरी करणार हा उद्देश समोर ठेऊन कारागृह प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. यापूर्वी अनेक कैद्यांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
नाशिक कारागृहात जवळपास 3 हजार कैदी शिक्षा भोगत आहे. त्यामध्ये नाशिकच्या कारागृहातील जवळपास शंभरहून अधिक कैदी डिग्री आणि डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. त्यामध्ये आता आणखी 120 कैदी आयआयटीच्या शिक्षण उपक्रमात सहभागी होणार आहे. वर्षभरात याच्या दर तीन महिन्याला परीक्षा होणार आहे.
तीन बॅच करण्यात आल्या असून प्रत्येक बॅचमध्ये चाळीस जणांचा समावेश करण्यात आला आहे. 2019 मध्ये स्थापन केलेल्या संगणक कक्षाचा आता प्रत्यक्षात फायदा होणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना संगणक कक्ष वापरात आला आहे.
या शिक्षणाचा विशेष लाभ म्हणजे डिग्री पूर्ण केल्यास शिक्षेतील तीन महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांची सूट दिली जाणार आहे. त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचे शिक्षण यापूर्वी घेतले जात होते. त्यामध्ये 900 कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले असून आयआयटी शिक्षणाचे धडे देणार आहे.
याशिवाय ईग्नोच्या माध्यमातूनही 600 कैद्यांनी शिक्षण घेतले आहे. याशिवाय प्रमाणपत्र कोर्स देखील उपलब्ध करण्यात आले होते. त्यातूनही अनेक कैद्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये वकिलीचे शिक्षणासाठी लागणाऱ्या पाच कैद्यांना सीईटीची परीक्षा देण्यासाठी परवानगी सुद्धा दिली आहे.
महिला कैद्यांसाठी देखील शिवणकाम हा कोर्स उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये 65 कैद्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पुरुष आणि महिला कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिकच्या कारागृहातील कैदी शिक्षण घेत आहे.