Nashik | भाषा संवर्धनासाठी मराठीचा प्रसार करा; कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांचे आवाहन
राज्यभरात 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. शिवाय कवी कुसुमाग्रज यांची आज जयंती. विशेष म्हणजे त्यातही कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे नाशिकचे. त्यांचेही यावेळी स्मरण करण्यात आले.
नाशिक: भाषा संवर्धनासाठी मराठीचा (Marathi) जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) यांनी केले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (Maharashtra School of Medical Sciences) मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यभरात 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. शिवाय कवी कुसुमाग्रज यांची आज जयंती. विशेष म्हणजे त्यातही कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे नाशिकचे. त्यांचेही यावेळी स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली.
संस्कृतीचा प्रभाव…
कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या की, भाषा हे खरे तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे. मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भाषा शिकत असताना मुलांची बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता महत्त्वाची असते. यासाठी सभोवतालचे वातावरण व संस्कृतीचा भाषेवर प्रभाव असतो. भाषा समृध्द होण्यासाठी मातृभाषेतील साहित्याचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
…तर भाषा समृद्ध
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, मराठी भाषेचा वापर मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे. कार्यलयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करणेबाबत शासनाने निर्देशित केले असून आपण नियमित संभाषण मराठी भाषेत करावे. लिहिणे, वाचन करणे, ऐकणे या सगळया गोष्टी मराठीतच सवय प्रत्येकाने करावी. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवले तरच मराठी भाषा समृद्ध होईल, असे आवाहन त्यांनी केले.
वाचनाची गोडी लावा…
विशेष कार्य अधिकारी ब्रिगेडियर डॉ. सुबोध मुळगुंद म्हणाले की, लहान मुलांना भाषेच्या प्रभुत्वाची जान करून द्यावी. मराठी मातृभाषा ही आपली खरी शक्ती आहे. यासाठी सर्वांनी सतत मराठी पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृद्ध होण्यासाठी त्यातून बळकटी मिळते. वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर म्हणाले की, मराठी भाषेचा वापर केला, तरच भाषा टिकेल. यासाठी मराठी पुस्तकाचे वाचन करावे. पुस्तक वाचनानंतर जवळच्या व्यक्तीस वाचनासाठी द्यावे. जेणेकरुन वाचकांची संख्या वाढेल. भाषा समृध्द होईल व मराठीचा दैनंदिन जीवनात वापर वाढेल, असे आवाहन त्यांनी केले.
काव्य वाचन रंगले
विद्यापीठातील मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गीतगायन, नाटयप्रवेश, कविता वाचन केले. चेतना पवार, प्रमोद पाटील, प्रतिभा बोडके, डॉ. संतोष कोकाटे, शैलेंद्र जमदाडे, प्रशांत कोठावदे, संजय मराठे, डॉ. संजय नेरकर, अनिल लंकेश्वर, एस. एस. मुलानी, लीना आहेर, किशोर पाटील, प्रल्हाद सेलमोकर यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इतर बातम्याः
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग