नाशिकच्या कलाग्रामसाठी 8 कोटी द्या, पालकमंत्री भुजबळांचे पर्यटन मंत्री ठाकरेंना साकडे, काय काम रखडले?
नाशिकच्या गोवर्धन येथे 2014 मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र 2015 - 16मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद पडले आहे.
नाशिकः नाशिकच्या (Nashik) पर्यटनाला चालना देण्यासाठी दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकच्या गोवर्धन परिसरात ‘कलाग्राम’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम अपूर्ण असून प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा यासाठी एम.टी.डी.सी. कडून ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर नाशिक शहरात कलाग्राम उभारण्यात येत आहे. मात्र, निधी अभावी हे काम रखडले आहे. त्यामुळे या कामासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुठपर्यंत आले काम?
गोवर्धन येथे 2014 मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र 2015 – 16मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद पडले आहे. काही दिवसापूर्वी आपण गंगापूर डॅम येथे बोट क्लबची पाहणी केली. सदर बोट कल्बच्या जवळच हे कलाग्राम साकारले जात आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे. कलाग्रामच्या बाजारपेठेत आदिवासी बांधवानांही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता येईल तसेच त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची त्यांना संधी मिळणार आहे.
कोणती कामे रखडली?
पर्यटन विकास महामंडळाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये भरीव वाढ होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय इमारत, वर्कशॉप इमारत, खाद्य पदार्थांसाठी गाळे व 99 व्यापारी गाळ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, प्रवेशद्वार पुढील कुंपणभिंत अंतर्गत रस्ता, बाहय विद्युतीकरण, पाणीपुरवठा इत्यादी कामे पुरेशा निधीअभावी अपूर्ण आहेत. या अपूर्ण कामांसाठी एकरक्कमी 8 कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?