नाशिक : बेकायदेशीर पद्धतीने आमदार स्टिकर लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचा फंडा काही जण वापरत असतात. दहशत निर्माण करण्यासाठी काही जण विविध प्रकारचे वाहनांवर नावे किंवा स्टिकर लावून फिरत आहे. अशातच आमदार नावाचे स्टिकर लावून फिरणारेही समोर येत आहे. हा नवा प्रकार समोर आल्यानं कायदेशीर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात काही वाहनचालकांकडून आमदार असे लिहिलेले स्टिकर काचेवर लावण्यात आले आहे. प्रत्यक्षात या पदावरील व्यक्ती आणि वाहन यांचा परस्पर काही संबंध नसतो. काही आमदारांच्या घरातील सदस्यांनी तर काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांवर बेकायदेशीर पणे हे स्टिकर लावले आहे.
प्रशासकीय अधिका-यांवर आणि नागरिकांवर दबाव आणण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाच्या कारवाई पासून वाचण्यासाठी असे प्रकार मुद्दाम घडत आहे. कोणताही लोकप्रतिनिधी नसताना तसे भासविणे हा गुन्हा आहे.
लोकप्रतिनिधी असल्याचा अभास निर्माण करून नाशिक शहर आणि जिल्ह्यात जनतेत दहशत माजविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कृष्णा काळे, डॉ संदीप चव्हाण, निखिल भागवत, सागर बेदरकर, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, सुनील घुगे, प्रवीण बोराडे, अविनाश मालूनजकर यांनी हे निवेदन कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी नाशिकच्या ग्रामीण भागात तपासणी करत असतांना आमदार, खासदार, मंत्रालयातील पास लावून फिरणाऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली होती. त्यामध्ये अनेक जण प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा असा प्रकार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात थेट आमदार नावाचे स्टिकर असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत काही पुरावे असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या माध्यामातून काही कठोर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.