नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे दररोज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतात, त्यावरून भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदारांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जातो. संजय राऊत दररोज सकाळी येऊन जी बडबड करतात त्यामुळे शिवसेनेत ( Shivsena ) फूट पडलीये अशा स्वरूपाची टीका देखील अनेक नेत्यांनी केलीय, इतकच काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदारांनी संजय राऊत सकाळी दररोज कुत्र्यासारखे भुंकतात अशी टीका केली होती. याशिवाय शिवसेना संजय राऊत यांनीच संपवली असल्याचा आरोपही अनेक नेत्यांनी केला होता.
विरोधकांच्या अनेक प्रश्नांना संजय राऊत यांनी पलटवार केलेला असतांना आता नवा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असतांना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राजकारणात कुटुंबापर्यंत पोहचणे, विविध आरोप करणे, तुरुंगात टाकणे असे राजकारण महाराष्ट्राच्या इतिहास यापूर्वी कधीही झालेले नव्हते. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संस्कार आहे. त्यामुळे आम्ही कधीही असे राजकारण केले नाही.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना सुद्धा आम्ही कुणाच्या कुटुंबापर्यंत पोहचलो नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कधी सूडबुद्धीने वागले नाहीत. महाराष्ट्रात मात्र आता घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहे. याचे उत्तर गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं.
मला तुरुंगात टाकलं, अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले, नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले. आमच्यावर जे आरोप करतात ते खरे आणि तुमच्यावर जे आरोप करतात ते खोटे. तुम्ही सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात तुमच्याबाबतची पुरावे आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
कुटुंबापर्यन्त जाणे, तुरुंगात टाकणे हे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी नव्हते. हे घाणेरडे आणि दळभद्री राजकारण सुरू झाले आहे. राजकारणात ही कटुता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आणली आहे. आणि देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आणली आहे. असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
एकूणच तुरुंगात टाकण्याचे राजकारण हे देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे संजय राऊत यांनी आरोप केला आहे. याशिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला असून जहरी टीका केली आहे.