सिटी लिंक बस सेवा ठप्प ! कर्मचाऱ्यांनी उपासलं संपाचं हत्यार, काय आहे कारण ?
नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणाऱ्या सिटी लिंक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासून शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
नाशिक : नाशिक शहरात मोठा गाजावाजा करून नाशिक महानगर पालिकेने बस सेवा सुरू केली होती. त्यासाठी नव्याने बस खरेदी करत पालिकेने कंपनी स्थापन केली होती. त्याच्या माध्यमातून शहरात बससेवा सुरू आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पुन्हा पुन्हा त्याच मागण्या असल्याने प्रशासनाच्या विरोधात आता नागरिक ही संताप व्यक्त केली जात आहे. आजपासून पुन्हा सिटी लिंक बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाही, दिवाळीचा बोनसही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वारंवार विचारणा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यानी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक शहरातील नागरिकांना चांगली बससेवा मिळावी यासाठी नाशिक महानगर पालिकेने शहरात नव्या अद्यावायत बस सेवा दाखल करून घेत कंपनी स्थापन करून सिटी लिंक बससेवा सुरू केली. या बस सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर नाशिक महानगर पालिकेचे कौतुकही झाले.
पण दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर ही बस सेवा सुरू आहे. त्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीये. विशेष म्हणजे सहा महीने उतलून गेले तरी अद्याप दिवाळी बोनस मिळाला नाही असा आरोप आंदोलक कर्मचारी करत आहे. वारंवार विनंती करून नाशिक परिवहन महामंडळचे व्यवस्थापक दखल घेत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या याच गोंधळामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहे. अचानक सकाळच्या वेळेला कर्मचारी संप घोषित करत असल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असली तरी याबाबत पूर्व कल्पना देत नसल्याने नागरिकही नाराजी व्यक्त करत आहे.
नाशिक शहरातील आज वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. कर्मचारी देखील आपल्या मागणीवर ठाम असून हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतरही काही बदल न झाल्याने सिटी लिंकचे चालक आणि वाहक चांगलेच आक्रमक झाले आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाने याबाबत तोडगा न काढल्यासस नाशिककरांची चांगलीच मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे आता याबाबत कर्मचाऱ्यांची मनधरणी केली जात आहे. याबाबत काय तोडगा याबाबत निघतो याकडे नाशिककरणाचे लक्ष लागून आहे.