बँक अडचणीत असताना मॅनेजरसाठी गावकरी एकवटले, मॅनेजरची बदली रद्द करण्यासाठी पाहा काय केलं?
जिल्हा बँकेच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असतांना कर्ज वसूली करून सुद्धा शेतकऱ्यांनी मॅनेजरच्या बदली रद्दकरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
येवला, नाशिक : सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांच्या निशाणावर असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. असे असताना मॅनेजरची बदली रद्द करावी यासाठी येवला तालुक्यातील सायगाव येथील गावकरी एकवटले आहे. बँकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर ज्या मॅनेजर शेतकाऱ्यांकडून कर्ज वसूलीची कामगिरी केली त्याची बदली करून बँकेच्या प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्हा बँक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असतांना एखाद्या कर्मचाऱ्यासाठी ते शेतकरी आक्रमक होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेत सायगाव, पांजरवाडी, नारखेडे आणि अंगुलगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे खाते आहे.
सायगावच्या शाखेचे मॅनेजर संजय नागपुरे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत कर्ज वसुली सुद्धा चांगली केली आहे. नव्याने कर्ज वाटप चालू केले असताना त्यात मॅनेजर संजय नागपुरे यांची अचानक बदली करण्यात आली.
विशेष म्हणजे संजय नगपुरे यांची बदली झालेली असतांना त्या पदावर नवीन नियुक्ती न केल्याने पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. तसेच कांद्याचे सानुग्रह अनुदान अर्ज करण्याची मुदतही उद्या संपणार आहे.
दरम्यान अनुदानाच्या अर्जाच्या संदर्भात मुदत संपत आल्याने अनुदानाची रक्कम खात्यांमध्ये लवकर वर्ग होईल अशी स्थिती आहे. ती रक्कम मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
संतप्त सोसायटीचे संचालक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत मॅनेजर संजय नागपुरे यांची बदली रद्द करावी यासाठी प्रवेशद्वाराच्या गेटलाच टाळे ठोकले आहे. जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत टाळे ठोको आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे.
सायगाव येथील शेतकऱ्यांनी आणि काही सोसायटीच्या संचालकांनी घेतलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे बँकेचे दैनदिन कामकाज करण्यासाठीचा पेच निर्माण झाला आहे. बँकेच्या मॅनेजर करिता शेतकरी आक्रमक झाल्याचे हे प्रकरण पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सायगव येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा होत आहे. एखादा मॅनेजर वसूली करीत असतांना विरोध न करता त्याला प्रतिसाद देणे आणि त्याच्या बदलीनंतर बदली रद्द करिता आक्रमक झाल्याने जोरदार चर्चा होत आहे.