व्हिसलमॅन ‘मन की बात’ च्या 100 व्या कार्यक्रमाला आमंत्रित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही केला गौरव
पर्यावरणदूत म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रकिशोर पाटील यांची 'व्हिसलमॅन' म्हणून ओळख आहे. 2022 च्या मन की बात मध्ये चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव करण्यात आला होता.
नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विशेष कार्यक्रम पार पडत असतो. त्यामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या नागरिकांशी नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधत असतात. त्याचा 100 वा भाग दिल्लीत पार पडणार आहे. प्रसार भारतीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांना नागरिकांना 100 व्या भागात सन्मानित करणार आहे. त्यासाठी पूर्वी नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये संवाद साधला आहे अशा सर्वांना दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकच्या ‘व्हिसलमॅन’ ला देखील संधी मिळाली आहे. नाशिकचे ‘व्हिसलमॅन’ म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रण मिळाले आहे.
पर्यावरणदूत म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रकिशोर पाटील यांची ‘व्हिसलमॅन’ म्हणून ओळख आहे. 2022 च्या मन की बात मध्ये चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव करण्यात आला होता. त्यावेळी स्वच्छाग्रही म्हणून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चंद्रकिशोर पाटील यांचा उल्लेख केला होता.
नाशिकच्या गोदावरी, नंदिनी आणि शहरातील विविध भागात स्वच्छतेसाठी गेल्या काही वर्षांपासून चंद्रकिशोर पाटील कार्य करत आहे. नदीत कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ते रोखतात. आणि नदीच्या किनारी एका जागेवर कचरा संकलित करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची असलेली सेवा बघून मन की बात मध्ये त्यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यानंतर चंद्रकिशोर पाटील हे देशभरात ओळखले जाऊ लागले होते. नरेंद्र मोदी यांनी चंद्रकिशोर पाटील यांच्या सेवेचे कौतुक केले होते.
त्यानंतरही अखंडपणे चंद्रकिशोर पाटील हे काम करत आहे. याच दरम्यान चंद्रकिशोर पाटील यांची ‘व्हिसलमॅन’ म्हणून ओळख निर्माण झाली. चंद्रकिशोर पाटील हे स्वच्छतेसाठी काम करत असतांना त्यांच्या कडे शिट्टी असते. आलेल्या प्रत्येकाला ते शिट्टी मारून रोखतात.
शहरातील नागरिक कचरा टाकण्यासाठी सर्रासपणे नदीचा वापर करतात. तो प्रकार रोखण्यासाठी चंद्रकिशोर पाटील हे शिट्टीच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला कचरा टाकण्यापासून रोखतात. विशिष्ठ ठिकाणी कचरा संकलित करून घंटा गाडीत टाकत असतात.
चंद्रकिशोर पाटील यांची ही सेवा नित्यनियमाने असते. त्यामुळे नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रकिशोर पाटील यांचा मोठा सहभाग आहे. नदी स्वच्छ राहण्यासाठी चंद्रकिशोर पाटील हे खूप मेहनत घेतात. आणि त्याचीच दखल नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.
दिल्लीत होणारे कार्यक्रमाचे प्रसारण 30 एप्रिलला होणार आहे. तीन दिवस हा विशेष कार्यक्रम होणार असून मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच दरम्यान व्हिसलमॅन यांना निमंत्रण असल्याने चंद्रकिशोर पाटील चर्चेत आले आहे.