नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरी नदीला पूर
पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून 1713 क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात पाणी सोडण्यात आलं. गोदावरीलाही पूर आला आहे. गोदावरी किनारी बुधवार असल्याने आठवडे बाजार भरला होता आणि या ठिकाणी व्यवसायिकांसह ग्राहकांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
नाशिक : मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ (Nashik rain Gangapur dam) घातलाय. सलग पाच ते सहा तास सुरु राहिलेल्या पावसामुळे धरणांमधून (Nashik rain Gangapur dam) मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आलाय. पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून 1713 क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात पाणी सोडण्यात आलं. गोदावरीलाही पूर आला आहे. गोदावरी किनारी बुधवार असल्याने आठवडे बाजार भरला होता आणि या ठिकाणी व्यवसायिकांसह ग्राहकांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
अचानक पाऊस मुसळधार सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला. यावेळी येथील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. सातपूर परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. एमआयडीसी परिसरात पाणी जास्त प्रमाणात साचल्याने कामगारांच्या दुचाकी देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अनेकांचं नुकसान झालं.
अंबिका स्वीटजवळ एक कामगार नाल्यात पडून वाहून गेल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात अग्निशमन विभागाचं शोधकार्य सुरू आहे. मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नाही. ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झाली.
पावसाचा जोर वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील धरणे 100% भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी, दारणा आणि इतर नद्यांच्या नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे.
नागरिकांना सूचना
- नदीकाठच्या नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये
- पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये
- विद्युत खांबापासून दूर रहावे
- जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे
- वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये
- कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
- धोकादायक क्षेत्रात सेल्फी काढू नये
- पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी
धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
- गंगापूर 1713 क्यूसेक्स
- भावली 290 क्यूसेक्स
- कश्यपी 211 क्यूसेक्स
- आळंदी 86 क्यूसेक्स
- दारणा 8985 क्यूसेक्स
- पालखेड 2825 क्यूसेक्स
- नांदूर मध्यमेश्वर 6310 क्यूसेक्स
- होळकर पूल 11210 क्यूसेक्स
- करंजवन 3600 क्यूसेक्स
- कडवा 3385 क्यूसेक्स
- ओझरखेड 932 क्यूसेक्स