Nashik Trees | नाशिकमधल्या ‘त्या’ 200 वर्षे जुन्या वटवृक्षाला आदित्य ठाकरे देणार भेट; पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला बळ!
आदित्य ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर पर्यावरणप्रेमी या उड्डाणपुलाविरोधात आक्रमक झाले आहेत. जुना वटवृक्ष तर वाचवूच, पण परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर सध्या चर्चेत असलेल्या उंटवाडी परिसरातील महाकाय आणि तब्बल 200 वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या वटवृक्षाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उद्या भेट देणार आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला बळ मिळणार आहे. या भागात एक उड्डाणपूल होत आहे. त्यासाठी या वटवृक्षासह किमान साडेचारशे ते पाचशे झाले तोडली जाणार आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हे झाड वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
असे पेटले आंदोलन…
नाशिकमध्ये सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर दरम्यान एक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यावरून स्थानिक पातळीवर राजकारणही सुरू आहे. मात्र, आता या उड्डाणपुलासाठी उंटवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पुरातन अशा 200 वर्षांपेक्षाही जास्त वय असणाऱ्या वडाच्या झाडावर कुऱ्हाडीचे घाव पडणार आहेत. इतकेच नाही, तर या कामासाठी एकूण 450 पेक्षा जास्त झाडे कापावी लागणार आहेत. त्यासाठी ब्रह्मगिरी बचाव समिती, म्हसोबा देवस्थान समिती आक्रमक झाली आहे. याबद्दल महापालिकेकडे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. ही बातमी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना या प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाईन बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. तशी माहिती आदित्य यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य म्हणतात की, मी नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलाश जाधव यांच्याशी बोललो आणि त्यांना प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाईनची पुनर्रचना करण्याची विनंती केली. या उड्डाणपुलासाठी एक 200 वर्षे जुने झाड आणि इतर साडेचारशेपेक्षा झाडे तोडावी लागतील. 200 वर्ष जुने वटवृक्ष आणि त्यामधील मंदिराचे जतन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
उद्या देणार भेट
यासंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा झाडे वाचवण्याबद्दल फोन आला होता. आम्ही त्यांना उड्डाणपुलाचे डिझाईन्स बदलण्यासंदर्भात बोललो. उड्डाणपुलाच्या पिलियर्सच्या जागा बदलू. जास्तीत जास्त झाडे वाचवू. अनेक झाडांचे ट्रान्सप्लान्ट करू. तशा पद्धतीने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. पुरातन 200 वर्षे जुना वटवृक्षही वाचवू. तशा पद्धतीने सारी आखणी करू, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आता या साऱ्या प्रकारानंतर आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते या झाडाला भेट देणार आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला बळ मिळणार आहे.
पर्यावरणप्रेमी आक्रमक
आदित्य ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर पर्यावरणप्रेमी या उड्डाणपुलाविरोधात आक्रमक झाले आहेत. जुना वटवृक्ष तर वाचवूच, पण परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अजिंक्य गीते, चंद्रकांत पाटील, प्रशांत लोणारी अशा सामाजिक कार्यकर्त्यांसह ब्रह्मगिरी बचाव समिती, म्हसोबा देवस्थान समिती आक्रमक झाली आहे. याबद्दल महापालिकेकडे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
असा आहे वटवृक्ष…
-वय : सुमारे 200 वर्षे
-वेढा : 9 मीटर 25 सेंटिमीटर
-पूर्व-पश्चिम विस्तार :42.02 मीटर
-दक्षिण-उत्तर विस्तार : 30.22 मीटर
-आकारमान : 765 मीटर वर्ग
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना