मंत्री दादा भुसे यांची खरंच गुप्त भेट घेतली? आदित्य ठाकरे यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 19, 2023 | 7:02 PM

दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या वृत्तावर दादा भुसे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री दादा भुसे यांची खरंच गुप्त भेट घेतली? आदित्य ठाकरे यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया
Follow us on

नाशिक | 19 ऑगस्ट 2023 : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पण या वृत्ताचं मंत्री दादा भुसे यांनी खंडन केलं आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण आपल्या कौटुंबिक कामांसाठी नाशिकला आल्याचं सांगितलं. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे देखील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांना दादा भुसे यांच्यासोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी दादा भुसे खरंच रिसॉर्टवर होते का? असा उलटप्रश्न विचारला.

“मी छुपी भेट करत नाही. हुडी घालून कुणाला भेटायला जात नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. “नाही. ते खरंच तिथे होते? आपण सगळे तिथे होता. अशी छुपे भेट नाही किंवा हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही. मुख्य गोष्ट ही होती की, अनेक दिवसांपासून मला त्या रिसॉर्टला भेट द्यायची इच्छा होती. इथल्याच व्यक्तीने ते रिसॉर्ट बनवलं आहे. मला ते बघायचं होतं”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

‘छुप्या भेटींची गरज नाही’

“मी पर्यटन मंत्री होतो तेव्हापासून या रिसॉर्टबद्दल ऐकत होतो. आज संधी मिळाली. मध्य मी एका लग्नासाठी आलो होतो. या रिसोर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन एकत्र केलं आहे. म्हणून मी ते बघायला गेलो. छुप्या भेटींची गरज नाही. जे आहेत जगजाहीर असतं”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

दादा भुसे यांच्याकडूनही स्पष्टीकरण

दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील या गुप्त भेटीच्या चर्चांचं खंडन केलं आहे. “मी या क्षणाला सुद्धा तुम्हाला माझं लोकेशन पाठवलं आहे. नाशिकमध्यल्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या नातीचा पहिला वाढदिवस साजरा करतोय. मालेगावला लहान मुलांच्या उपस्थितीत नातीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्हाला करायचा होता. पण पाऊस नसल्यामुळे पीकं करपायला लागली आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबापुरता वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं”, असं दादा भुसे यांनी सांगितलं.