अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, दादा भुसे यांच्या विरोधात विधानसभेत उभे राहणार?; दादा भुसे यांची प्रतिक्रिया काय?
माझ्या विरोधात विधानसभेत उभे राहण्याची रणनीती असू शकते. मी शिवसैनिक म्हणून काम करतो. मी काही निवडणुकीपुरतं काम करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे.
नाशिक : मालेगावातील अद्वय हिरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकला. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले. त्यानंतर बोलताना त्यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. मी दादा भुसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं आव्हान दिलं. यावेळी बोलताना दादा भुसे यांनी सावध पावित्रा घेतला. फक्त निवडणुकीसाठी काम करायचं नसतं. शिवसैनिक म्हणून काम करायचं असतं, असा उपरोधित टोला दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
दादा भुसे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेमध्ये सभा घेणं, आपलं मत ठेवणं, कोणीही कोणत्याही पक्षात जाणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. अद्वय हिरे यांनी तसेच उद्धव ठाकरे यांना मालेगावातील सभेसाठी शुभेच्छा देतो.
शिवसैनिक म्हणून काम करतो
माझ्या विरोधात विधानसभेत उभे राहण्याची रणनीती असू शकते. मी शिवसैनिक म्हणून काम करतो. मी काही निवडणुकीपुरतं काम करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यानुसार आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो, अशी कोपरखडी दादा भुसे यांनी लगावली.
न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम होणार
विकासकामं, सुखदुःख यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो. निवडणुका येतात नि जातात. निवडणुकीकरिता काम करायचं नसतं. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही मार्गदर्शक तत्व आहेत. त्यानुसार अंमलबजावणी होईल, असं दादा भुसे म्हणाले.
अद्वय हिरे हे मालेगावातील मोठं नाव आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला होता. पण, भाजपने त्यावेळी काही लक्ष दिलं नाही, असा आरोप अद्वय हिरे यांनी भाजप सोडल्यानंतर केला. त्यानंतर आता आमिष दाखवून काही फायदा होणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलं. या सर्व प्रतिक्रियेवर दादा भुसे यांना सावध प्रतिक्रिया दिली.