सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा आहे. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाकाच फोडला.
मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास तिष्ठत ठेवल्याचा आरोप होतोय. नाशिक-नगर दौऱ्यात अमित ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटून त्यांची मत, विचार जाणून घेत आहेत. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्याला प्रतिसादही चांगला मिळतोय.
कुठला टोलनाका होता?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे.
अमित ठाकरे यांची काय प्रतिक्रिया?
या वादावर आता अमित ठाकरे यांची बाजू समोर आली आहे. “टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘माझ्यामुळे आणखी एक वाढला’
“मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला” असं अमित ठाकरे म्हणाले.
काल रात्री 9 वाजता हा राडा झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मनसैनिकांचं हे आक्रमक रुप पाहून टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणले.