मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ लावणार? उद्धव ठाकरे यांच्या सभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’; तोफेचा मारा कुणावर?
नाशिकच्या मालेगावमधील महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. या सभेला एक लाख लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मालेगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा होत आहे. सत्तांतरानंतरची आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा असणार आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मालेगावात सभा होत असल्याने उद्धव ठाकरे या सभेतून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत त्यांच्या रडारवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मंत्री दादा भुसे असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यावरूनही उद्धव ठाकरे भाजपला घेरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या सभेची संपूर्ण राज्यात उत्सुकता ताणली जात आहे.
मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाचा गर्जना मेळावा होत आहे. आज संध्याकाळी 6 नंतर या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेला एक लाख लोक येतील असं सांगितलं जात आहे. त्यानुसार या सभेत बसण्याची व्यवस्था केली जात आहे. या सभेच्या ठिकाणी संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच सभेच्या आसपासच्या परिसरात आणि मालेगावच्या प्रमुख भागात, चौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.
एलईडी स्क्रिनमुळे उत्सुकता ताणली
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या स्टेजसमोरच एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेही आजच्या सभेतून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांवर तोंडसुख घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांची दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सभा झाली होती. तर एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेड येथे सभा झाली होती. या दोन्ही सभेतून एलईडी स्क्रीनवर व्हिडीओ दाखवण्यात आले होते. खेडच्या सभेतील व्हिडीओमधून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला होता.
तो व्हिडीओ लावणार?
आज उद्धव ठाकरेही स्क्रीनवर व्हिडीओ लावून शिंदे यांची पोलखोल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी ठाण्यातील सभेत आमच्या खिशात राजीनामे असल्याचं म्हटलं होतं. तसेच भाजपच्या मंत्र्यांकडून अन्याय होत आहे. त्यामुळे भाजपसोबतची युती तोडा असं शिंदे यांनी मागे एकदा म्हटलं होतं. त्या सभेचा व्हिडीओ उद्धव ठाकरे यांच्याकडून आजच्या सभेत दाखवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अली जनाब…
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. विविध समाजघटकांशी त्यांनी युती आघाड्या सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम मतदारांनाही आपल्याकडे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने मालेगावात या सभेचे उर्दू भाषेत पोस्टर लागले आहेत. त्यावर अली जनाब उद्धव ठाकरे असं लिहिलं आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आपल्याकडे खेचण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. त्याला मुस्लिम बांधव किती प्रतिसाद देतात हे आजच्या सभेतून स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.