तुम्ही देवळात वाजवण्याची घंटा…; लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्यांना अजितदादांचं प्रत्युत्तर
Ajit Pawar on Ladki Bahin Yojna and Mahavikas Aghadi : अजित पवार यांची 'जनसन्मान यात्रा' आज नाशिकच्या सिन्नरमध्ये आहे. या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सध्या ‘जनसन्मान यात्रा’ करत आहेत. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. सिन्नरमध्ये ही यात्रा आज आहे. अजित पवार यांनी सिन्नरकरांना संबोधित केलं. ‘लाडकी बहिण योजने’वर टीका करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावर तुम्ही टीका करताय. पण तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा काय केलं? देवळात वाजवण्याची घंटा ही दिली नाही, असं अजित पवार म्हणाले.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- अजित पवार
आजपर्यंत बांधल्या नाहीत, तेवढ्या राख्या गेल्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आर्थिक शिस्त आम्हाला कळते. 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करणे हे येड्या गबळ्याचं काम नाही. खोट का सांगतात, माहिती घ्या आणि बोला. आचारसंहिता लागू होण्या पूर्वी दमण गंगा पिंजाळ प्रकल्पाना मंजुरी देण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.
राज्यातील मुला, मुलींना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी आता इथे आलो तेव्हा रथात बसलो लग्नात बसतात तसं बसवलं.. नववधू आणि नवरदेवाला बसवतात तसं बसलो. आम्ही लग्नात घोड्यावर ही बसलो नव्हतो ते आता पुरे करून घेतलं, अशी मिश्किल टिपण्णीही अजित पवार यांनी यावेळी केली.
सिन्नरकरांना अजित पवारांचा शब्द
राज्यातील यात्राचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे केली हे सांगत आहे. भांगरे यांच्या स्मारकासाठी मागणी केली आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे ते कसे पूर्ण होईल यासाठी लक्ष देणार आहे. सिन्नरची वसाहत आहे चांगल्या पैकी सुरू आहे, मात्र अडचणी आहेत. सोमवार ते गुरुवार राज्याच्या दौऱ्यावर आहे. आज मागण्यांसाठी जे निवेदन दिले आहेत. त्या संदर्भात सोमवारी तयारी करा, मंगळवारी जे जे प्रश्न मांडले ते सोडविण्यासाठी बैठक घेणार आहे, असा शब्द अजित पवारांनी यावेळी दिला.