सर्वात मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाला भगदाड, निव़डणुकीच्या तोंडावर 12 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिका आहेत. या महापालिकांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
नाशिक: शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष सावरण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी आता राज्यभर फिरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच बुलढाण्यात सभा घेतली. एकीकडे पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं भगदाड पडण्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी ठाकरे गटातील 12 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. उद्या सोमवारी नाशिकचे 12 माजी नगरसेवक मुंबईत येणार आहेत. त्यानंतर मंगळवारी वर्षा निवासस्थानावर 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे गटात प्रवेश प्रवेश केल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्याची तयारीही सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. नाशिक महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटात नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकविल्याने ठाकरे गटात अस्वस्थता आहे. या बंडाच्या निमित्ताने पालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिका आहेत. या महापालिकांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक महापालिकेत आपली सत्ता आणण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, आता ठाकरे गटाच्या या प्रयत्नांना सुरूंग लागताना दिसतो आहे.
दरम्यान, शिंदे गटात कोणते नगरसेवक प्रवेश करणार याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, हे नगरसेवक नाशिक महापालिकेतील प्रभावशाली नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे.