अंतरवलीमधील दगडफेकीमागे राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन आमदारांचा हात, छगन भुजबळांच्या दाव्याने खळबळ
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मागील वर्षी 2 सप्टेंबरला पोलिसांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला होता. त्यावेळी आंदोलकांनीही दगडफेक केली होती. यामध्ये पोलीस आणि आंदोलकही जखमी झाले होते. या घटनेमागे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा हात असल्याचा खळबजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी दोन ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे तर आमदार राजेंद्र राऊत यांनीही बार्शी येथे 12 सप्टेबरपासून ठिय्या आंदोलन केलंय. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण गेमचेंझर ठरण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आपणही जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. जरांगे यांच्यावर ते मविआचे असल्याचा आरोप भाजप नेते करतात. मात्र अशातच अजित पवार गटाचे नेते आणि मंंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे.
ज्यावेळेला अंतरवाली सराटी येथे दगडफेक झाली, लाठीमार झाला. जरांगे तिथून निघून गेले होते. त्यावेळी रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांची नावे पुढे आलीत. दोघांनी त्यांना तिथे आणून बसवलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही कल्पना नव्हती की पोलिसांवर दगडफेक झाली आहे. दोन्ही नेते गेल्यामुळे एकच बाजू जनतेपुढे आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, असं म्हणत जाहीर आव्हान रोहि्त पवार यांनी भुजबळांना दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
भुजबळ यांनी त्यांनी आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल. मी यावर इतकंच सांगेल हे सरकार आणि मराठा समाजाला न्याय देणारे आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, त्याचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम जस्टीस शिंदे कमिटीने केलं. विशेष अधिवेशन बोलवून 10 टक्के आरक्षण घेतलं. सारखीमध्ये कोर्सेस वाढवले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ एक लाख मराठा तरूणांना उद्योजक बनवलं. महायुती सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.