भुजबळांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान; साहित्य संमेलनच्या यशस्वी आयोजनाबद्दल नाशिकमध्ये कोडकौतुक
मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्री छगन भुजबळांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर पोहचविण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा, यासाठी तिला स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपली जबाबदारी असल्याचे आवाहन यावेळी भुजबळांनी केले.
नाशिकः राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा गिरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भुजबळांचा हा सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, एका नदीच्या नावाने गिरणा प्रतिष्ठान उभे राहते आणि अविरत 23 वर्ष काम करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नदीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्या नदीचा सन्मान आहे. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर (Maharashtra) पोहचविण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा, यासाठी तिला स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपली जबाबदारी असल्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह,पोलीस अधीक्षक सचिन पाटील , नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,, निर्माण ग्रुपचे नेमिचंद पोतदार, आनंद अॅग्रोचे उद्धव आहेर, ललित रुंगठा ग्रुपचे अभिषेक बुवा, गिरणा गौरवचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मनामनातले अंतर तोडा
सोहळ्यात भुजबळ म्हणाले की, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, लोककलांचा जागर करणारी संस्था म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठान आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व जोडली आहेत. या माणूस जोड प्रकल्पातून निरंतर आशा व उमेद घेऊन ही संस्था अनेकांची ऊर्जा बनली. हात नको मनं जोडा, मनामनातले अंतर तोडा, हे ब्रीद घेऊन माणुसपणाचा शोध घेणारी ही संस्था आहे. मेहनत आणि सामाजिक योगदान देऊन नैतिक मूल्य जपणारी माणसे, अशा गुणवंत माणसांचा शोध घेणारी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य गिरणा गौरव प्रतिष्ठान रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही भावना मनात रुजवत गेल्या दोन दशकांपासून मार्गक्रमण करीत आहे.
निरंतर माणुसकीचा झरा
भुजबळ म्हणाले की, माणसातील माणुसकी जपणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठान संस्थेने जी माणसे समाजाभिमुख काम करतात, प्रसिद्धीपासून दूर राहून काम करतात, त्यांच्या कर्तृत्वाला लौकिक मिळावा, हा प्रामाणिक हेतू अंगी बाळगला. अशा कर्तृत्वान माणसांना बळ मिळावे, त्यांचे कौतुक व्हावे, त्यांच्या पाठीवरून शाबासकीची थाप देऊन त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची पावती देणेच पाहिले. गिरणा गौरव प्रतिष्ठानने जी माणसे जोडली ती समृध्दपणे जोपासली सुद्धा. या जगात माणूस हाच खरा जीवन जगण्याचा मूळ पाया आहे. त्यामुळेच गिरणा गौरव प्रतिष्ठानमधून आजही निरंतर माणुसकीचा झरा वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.