विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीत अजित पवार गट किती जागांवर लढणार? याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा सांगितला आहे. आमचे जे कारभारी आहेत. अजितदादा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे त्यांना माहिती आहे की जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत आली आहे ते. मी काही त्या चर्चेमध्ये जास्त लक्ष घालत नाही. मला काही जास्त माहिती नाही. पण अजित पवारांनी महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या किती मिळणार? किती निकाल येतो, मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.
प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला माहिती नाही. महायुती सरकाराने जे कार्यक्रम सुरु केले. आश्वासन नाही, घोषणा नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना सोलर पंप विज आणि वीज माफ असेल. विद्यार्थ्यांना स्टाईपेन, मुलींना मोफत शिक्षणाचे असेल या योजना सुरु झाल्या. आम्ही आश्वासने दिली नाही. पेन्शन योजनेमध्ये सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन-तीन पर्याय शोधण्यात आले आहेत. पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय त्यांना स्वीकारण्याची मुभा देण्यात आली, असं छगन भुजबळ म्हणाले.
‘वन नेशन वन इलेक्शन’ साठी केंद्र सरकार तयारी करत आहे लवकरच ते लागू केली जाईल अशी शक्यता आहे. यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, विधानसभा आदी निवडणुका लागल्या की दोन महिना आचारसंहितेत जातात. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आचार संहिता लागते, त्यामुळे कामे होत नाही. सगळी कामे ठप्प होतात, असं भुजबळ म्हणाले.
‘वन नेशन वन इलेक्शन’चा फार पूर्वीपासून हा विचार सुरू आहे. काही विधानसभा विसर्जित झाल्या त्यानंतर हळूहळू थोडसं बदलत गेलं. टाईम टेबलही विस्कळीत झालं. हे कसं शक्य होईल म्हणून या विषयाला काही लोकांचा विरोध सुद्धा आहे. असे असंख्य प्रश्न आहेत.. यावर केंद्र सरकार काय कल्पना काढतय याबाबत मला कल्पना नाही. पण सर्वांचा विचार करून काहीतरी मार्ग काढून त्यावर ते निर्णय घेतील, असं म्हणत भुजबळांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’बाबत सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे.