स्वत:चा पक्ष काढून पाच आमदार निवडून आणून दाखवा; संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले
राहुल गांधी सारखे अनेक लोक आहेत. जे झुकत नाहीत, त्यापैकी राहुल गांधी आहेत. आम्हाला राहुल गांधींविषयी प्रेम आहे. जुल्मी सरकार पुढे झुकण्यास नकार दिला आणि लोकसभेचं सदस्यत्व गमावलं, असं त्यांनी सांगितलं.
नाशिक : राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर फक्त उद्धव ठाकरेच राहिले आहेत. एवढं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मोठं आहे. गेल्या 18 ते 20 वर्षात यांना काहीच विषय राहिला नाही. तुम्ही तुमचा पक्ष किती वाढवला ते आधी पाहा. एकनाथ शिंदे यांनी आधी स्वत:चा पक्ष काढून पाच आमदार निवडून दाखवावेत, असं आव्हानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. शिंदेंनी निवडणूक आयोगाशी संगनमत करून शिवसेना चोरली. चोराला चोर साथीदार असतो. त्यांनी स्वत: निवडणुकीला सामोरे जावं आणि मग स्वत:ची ताकद दाखवावी. आमची ताकद चोरून दाखवत बसू नका, असा चिमटा राऊत यांनी काढला.
राज ठाकरे यांची रेकॉर्ड उद्धव ठाकरेंशिवाय पुढे जात नाही. एकनाथ शिंदे असो, नारायण राणे असो की फडणवीस असो यांची रेकॉर्डही उद्धव ठाकरे यांच्या पुढे जात नाही. याचाच अर्थ यांच्या मनात प्रचंड भीती आणि दहशत आहे. हा नेता शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि आम्हाला घरी बसवेल ही भीती त्यांना वाटते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले आम्हाला मिंधे आणि खोकेवाले म्हटलं आजतं. माझा त्यांना सवाल आहे, मिंधे आणि खोकेवाले का म्हणतात हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. अख्ख्या देशात तुमची छी थू होतेय. का होतेय याचा विचार करा. ते थांबवायचं असेल तर निवडणुकीला सामोरे जा. लोक चिडलेले आहेत. शहाणे असाल, इमानदार असाल आणि बंड केलं म्हणतात तर राजीनामा द्या. निवडणुकीला सामोरे जा. त्यातून तुमची खरी ताकद कळेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे यांना ठणकावले.
ऊर्दूवर बंदी आलीय का?
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे ऊर्दूतून पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जनाब असा केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बॅरिस्टर अंतुले यांनाही आम्ही जनाब म्हणायचो. प्रत्येकाची भाषा आहे. या देशात ऊर्दूवर बंदी आली का? कैफी आजमीपासून ते मजरुह सुल्तानपुरींपर्यंत सर्वांनी ऊर्दू भाषा संपन्न केली. जावेद अख्तर यांचं परवा कुणी तरी कौतुक केलं. आम्ही सर्वात आधी सामनातून जावेद अख्तर यांचं अभिनंदन केलं होतं. तेच जावेद अख्तर ऊर्दूतून लिहितात, असंही ते म्हणाले.
त्यात गैर काय?
लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे नेते आहेत असं मुस्लिमांना वाटत असेल तर गैर काय? मोदींनाच मुस्लिमांनी नेता मानावे काय? मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पुढचे आमदार अद्वैत हिरे असेल, असंही त्यांनी जाहीर केलं.
मुस्लिमांचं स्वागत
या देशातील मुसलमान हा प्रखर राष्ट्रभक्त मुसलमान आहे. मोदी आणि त्यांचा पक्ष देशातील लोकशाहीला मारक भूमिका घेत आहेत. हे हिंदुत्व नाही. हिंदुस्थान खतम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा देश सर्वांचा आहे. हिंदुत्व आमची संस्कृती, संस्कार आहे. आमचं राष्ट्रीयत्व आहे. ते राहणार. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम येणार आहेत. त्यांचं स्वागत आहे. आम्ही कोणत्याही भाषेच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत. मग तो कोणीही असो. बाळासाहेब ठाकरे यांची तीच भूमिका होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही अंधभक्त
यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. भक्ती ही अंधभक्ती असू नये. मोदींचे अंधभक्त या देशात निर्माण झाले आहेत. सावरकरांवर बोललो. आमच्यावर कुणीही टीका केली तरी आमचे सावरकरांवरील प्रेम कमी होणार नाही. सावरकरांना ब्रिटिशांच्या काळात अपील करण्याची संधी नव्हती. तेव्हा इंग्रजांचा कायदा होता. आम्ही वीर सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरांची तुलना कुणाशी करू नये. वाटल्यास आम्हाला सावरकरांचे अंधभक्त म्हणा. ते आहोत आणि राहणार. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, असं ते म्हणाले. राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली. त्यांनी माफी मागितली नाही. ती चांगली गोष्ट आहे. आम्हीही कुठे माफी मागितली? आम्हीही तुरुंगात गेलो. मिंधे गट, भाजपसमोर गुडघे टेकले असते तर आमची सुटका झाली असती. पण आम्ही तुरुंगाचा मार्ग स्वीकारला, असंही ते म्हणाले.