नाशिक : काँग्रेस पक्षातली (Congress Party) स्थिती सध्या चिंतानजनक आहे. चार वर्षे झाली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेटण्यासाठी वेळ मिळाली नाही, असे वक्तव्य उदयपूरच्या शिबिरानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले होते. त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांचं शिर्डीत शिबीर पार पडलंय. या शिबिराबाबतही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. काँग्रेसच्या शिर्डीतील शिबरा मध्ये आर्थिक,राजकीय विषयांवर चर्चा झाली. काँग्रेस पक्षाला नवं चैतन्य देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे अशी मागणीही या शिबिरात झाली अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे याही शिबिरात काँग्रेसमध्ये ठोस आणि पूर्णवेळ केंद्रीय नेतृत्वाची कमरता जाणवली आहेत.
तसेच काँग्रेसचे चिंतन शिबीर देखील झालेले नाही. पक्षात निवडणूक प्रक्रिया देखील झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कपिल सिब्बलांनी त्यांचे जी मतं आहेत ती ती त्यांनी पक्षात राहून मांडायला हवी होती, त्यांनी असं बाहेर पडायला नको होतं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी ही कडू गोळी आहे, पण भाजपला हटवायचे असेल तर ही कडू गोळी घ्यावी लागेल याची कल्पना होती म्हणून एकत्र आलो, असे ते म्हणाले आहेत. तर महापालिका निवडणुकींबाबत बोलताना ते म्हणाले, हा राज्यपातळीवरचा निर्णय आहे, स्थानिक पातळीवर हे ठरवायचं आहे, महाविकास आघाडी केली तर भाजपाचा सफाया होईल, तीन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे, पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतात, असेही ते म्हणाले.
तर यावेळी बोलताना त्यांनी, विविध मुद्द्यांवरून भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. आठ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचं दिवाळं वाजलं आहे, पेट्रोल, डिझेलची दरवाढ झालीय. बेरोजगारीचा दर उच्चांकी पण मोदींना घेणं देणं नाही. प्रचंड वेगाने धार्मिक ध्रुवीकरण, दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी काय कपडे घालतं, कोणी कशा प्रार्थना करतं यावर चर्चा सुरू आहेत. चीन आपली भूमिका सोडायला तयार नाही. पगार, पेन्शनचे प्रश्न आहेत. जीडीपीच्या 86 टक्के कर्ज आहे. तर 27 लाख कोटी फक्त कराच्या रूपाने गोळा केले, मात्र कर्ज काढले तरी सरकार चालत नाही. म्हणून सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.