नाशिक : गेल्या काही वर्षांपूर्वी एक नवीन पायंडा पडू लागला आहे. कारागृहतून एखाद्या गुंडाची किंवा भाईची सुटका झाली कि जल्लोष करणे, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करणे असे प्रकार समोर येऊ लागले आहे. नाशिकच्या जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. आ गये भाई बाहर असे म्हणत अनेकांनी व्हिडिओ काढत जल्लोष केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील कारागृहातून जामीनावर आणि न्यायालयाच्या निकालानंतर सुटका केली. त्यामध्ये शाहरूख रज्जाक शेख याचीही सुटका करण्यात आली. शाहरुख मूळचा नगरजिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील आहे. त्याची सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
कारागृहाच्या बाहेर जल्लोष आणि नियमांचे पालन न केल्यानं नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बारा वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील आरोपी असलेल्या शाहरुख शेखची सुटका करण्यात आली होती.
शाहरुख शेखची सुटका होताच समर्थकांनी भाई आ गये बाहर असे म्हणत जल्लोष केला, आदेशाचे उल्लंघन झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर एका आरोपीची तर मिरवणूक काढण्यात आली होती. विशेष म्हणजे आरोपी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे.
ढोल ताशाच्या गजरातील ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे कारागृहाच्या बाहेर पडताच जल्लोष करणे, मिरवणूक काढणे असे प्रकार अलिकडे समोर येऊ लागले आहे.
असे प्रकार वारंवार समोर येत असल्याने पोलिसांवरील ताण वाढत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.