आदिवासी मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार, पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिकच्या पहिने परिसरातील चिखलवाडी या गावात सर्वहरा परिवर्तन शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वसतिगृह आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक : शिक्षणाचे बाजरीकरण होतं आहे असे आपण आतापर्यंत अनेकवेळा ऐकले आहे. आता या पुढे जाऊन नाशिकमध्ये चक्क आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलीस करत आहेत. नाशिकच्या पहिने परिसरातील चिखलवाडी या गावात सर्वहरा परिवर्तन शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वसतिगृह आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुलींना बळजबरीने नाचवल्याचा आरोप
या परिसरात पर्यटकांचा एक गृप राहण्यासाठी आला होता. याच पर्यटकांसमोर या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना नाचवल्याचा आरोप पालकांनी केलाय. वारंवार अशा प्रकारे इथे येणाऱ्या पर्यटकांसमोर आपल्या मुलींना शिक्षण संस्थेकडून बळजबरीने नाचवले जाते. असा आरोप करत पालकांनी या संपूर्ण प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी दिली.
नृत्य रात्रीचे असल्याचे दिसते
या संपूर्ण प्रकरणी या शिक्षण संस्थेच्या अधीक्षक कामिनी केवट यांना विचारले असता हा प्रकार गैरसमजातून झाला आहे असा खुलासा त्यांनी केला. तसेच शाळेत येणाऱ्या पाहुण्यांसमोर मुलींनी आपली कला सादर केली. असे देखील त्यांनी यावेळी शिक्षण संस्थेकडून सांगितले. मात्र जे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत त्या व्हिडीओत मुलींकडून करून घेतलेले नृत्य रात्रीचे असल्याचे सिद्ध होते. तसेच पीडित मुलींच्या पालकांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपानुसार वारंवार असे प्रकार या मुलींसोबत का केलं गेलं हा प्रश्न देखील उपस्थित होतो.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न
आदिवासी भागात आजही मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या हेतूने पालक आपल्या मुलींना अशा वसतिगृहात ठेवतात. अशा वसतिगृहातदेखील असे प्रकार मुलींसोबत घडत असतील तर या आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. तसेच शिक्षणाच्या नावाखाली परिसरात आलेल्या पर्यटकांसमोर आपल्याच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवण्याचे हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे.