Nashik Earthquake : दिंडोरी तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, 4 दिवसानंतर पुन्हा धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
रविवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला, तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला.
नाशिक : दिंडोरी (Dindori) तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी साधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने (Administration) केले आहे. मेरी येथील भूकंप मापक केंद्रात नोंद (Earthquake Center) झाली. 2.1 आणि 2.5 रिश्टर स्केलची नोंद झाली. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन धक्के जाणवले. मेरी येथील केंद्रापासून 24 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के लागले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने ही माहिती दिली. या घटनेत काहीही नुकसान नाही. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रात्री झोपण्याच्या वेळी सौम्य धक्के
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला, तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. नागरिक झोपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात हा धक्का बसल्यानं नागरिक घराबाहेर पडले. जमिनीला हादरे बसल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. यापूर्वी आलेल्या धक्क्यात जांबुटके गावात मोठे हादरे बसले होते. नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के बसले. हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं. याच परिसरात रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. पेठ, सुरगाणा आदी भागात जुलै महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर दिंडोरीतही भूकंपाचे धक्के जाणवले.
नागरिकांनी घाबरू नये
चार-पाच दिवसांत दुसरा धक्का बसल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर आणि तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी मेरी भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर तीव्रतेची नोंद झाली. नाशिक शहरातपासून 17 किलोमीटरवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी, तळेगााव, उमराळे, मंडकीबांब या भागात 16 ऑगस्टच्या रात्री मोठा आवाज आला होता.