कृषिमंत्री दादा भुसेंच्या कामांची ईडी, एसआयटी चौकशी करा; भाजपची व्हिडिओ लावून मागणी
भाजप गटनेते सुनील गायकवाड म्हणाले की, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची ईडी किंवा एसआयटी कडून चौकशी करावी. मालेगाव बाह्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का वाढला म्हणून शिवसेना मुस्लिमांचे लांगुलचालन करत आहे. शहरात भाजपकडून केल्या जात असलेल्या विकासकामांना अडवणूक केली जात आहे.
मालेगावः कृषिमंत्री (Agriculture Minister) दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची ईडी (ED) आणि एसआयटीकडून चौकशी करा, अशी मागणी भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी त्यांनी व्हिडिओ लावून कृषिमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या. या पत्रकार परिषदेला भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा आणि ग्रामीण पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सुनील गायकवाड म्हणाले की, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची ईडी किंवा एसआयटी कडून चौकशी करावी. मालेगाव बाह्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का वाढला म्हणून शिवसेना मुस्लिमांचे लांगुलचालन करत आहे. शहरात भाजपकडून केल्या जात असलेल्या विकासकामांना अडवणूक केली जात आहे. हिंदुत्वाच्या नावाने मोठे झालेल्यांना आता हिंदुत्व शिकवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
शिवसेना मूग गिळून गप्प का?
सुनील गायकवाड यांनी सीएए, एनआरसी, हिजाब प्रकरणात शिवसेना गप्प का राहिली, असा सवाल केला. कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रिपदाचा अधिकार वापरून शहरात प्रस्तावित असलेले कत्तलखाने का थांबवले नाहीत, महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेने पाठीत खंजीत खुपसला. शहरात हिंदू अल्पसंख्याक असून त्यांच्या वर होत असलेल्या अन्यायबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजप आता गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महापालिकेची कामे संशयास्पद
खरे तर यापूर्वी उपमहापौरांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र, या पत्रकार परिषदेला उत्तर देताना भाजपने थेट कृषिमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले. सुनील गायकवाड यांनी यावेळी मालेगाव शहरामध्ये झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महापालिकेच्या विकास कामांची ईडी, एसआयटी चौकशी करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे ईदगाह मैदानावरून सुरू झालेले राजकारण आता थेट कृषिमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
मैदानाच्या जागेवरून कलगीतुरा
मालेगाव महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस मैदानासाठी राखीव असलेली शासकीय मालकीची जागा चक्क कायमस्वरूपी इदगाह ट्रस्टला देण्याचा ठराव मंजूर केलाय. महापालिकेची महासभा महापौर ताहेरा शेख आणि उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पोलीस कवायत मैदानाची जागा इदगाह ट्रस्टला द्यायचा विषय सभेसमोर आला. या विषयाला सत्ताधारी शिवसेनेसह भाजपने तीव्र विरोध केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. मात्र, महापौरांनी या गोंधळात ठराव मंजूर केला. यावरूनच आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत.
इतर बातम्याः