नाशिक : राज्याचे ऊर्जा मंत्री 12 कोटी जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केलाय. वित्त मंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या भांडणात राज्य अडचणीत आलंय. अनेकदा पत्र देऊन देखील कोळसा उचलला नाही. रेल्वे वापरला नाही. आमच्या सरकारच्या काळात 22 दिवसांचा कोळसा शिल्लक रहायचा. नियोजनाचा अभाव आणि राज्य सरकारने थांबवलेला कॅश फ्लो (Cash Flow) यामुळे नियोजन बिघडलंय, असंही ते म्हणालेत. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, मागच्या सरकारच्या काळापेक्षा जास्त कोळसा या सरकारला दिला. अनेक ठिकाणी आज लोड शेडिंग होत आहे. नागपुरातील वाठोडा (Vathoda in Nagpur ) भागात कालच वीज गूल झाली होती. सरकारने तिन्ही कंपन्या डुबवल्या आहेत. आज 15 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल कापले आहे, असा घणाघात बावनकुळे यांनी केलाय.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, या सरकारने 100 रुपयांसाठी वीज कापली. 15 ते 25 टक्के दरवाढ या सरकारने केली आहे. डबल सिक्युरिटी डिपॉझिट वसूल करत आहेत. ऊर्जा मंत्री बोलघेवडे आहेत. ऊर्जा मंत्र्याला मुखमंत्र्यांचा सपोर्ट नाही. लोकांना हे मूर्ख बनवत आहेत. शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही बिल बुडत नाही. एक दिवसात महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त होवू शकतो. देवेंद्र फडणवीस सरकार जर सत्तेवर आले, तर संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली.
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून काय केलं, या अपेक्षा असतात. मुख्यमंत्र्यांना विनंती की टोमणे सभा बंद करा आणि काय काम करणार ते सांगा, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरे यांना कोणतीही भूमिका नाही.
मुख्यमंत्री म्हणून राहणं एवढंच उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. कुठल्याही नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करू नये. चुका असतील तर विरोध केला पाहिजे. पण ही पद्धत नाही. सरकारने असं मत मांडल्यावर जेलमध्ये टाकायचं, हे देखील योग्य नाही, असं राणा दाम्पत्यांबद्दल ते म्हणाले. आज मोदींजींबद्दल, देवेंद्रजींबद्दल अनेक आक्षेपार्ह वक्तव्य होतात. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग मिटकरींवर गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलसा.