या नेत्याच्या नखाचीही सर देवेंद्र फडणवीस यांना नाही, रुपाली पाटील यांचा हल्लाबोल
अशा डोंगरावर उंदीर उड्या मारत असतात. त्यामुळं त्यांना उड्या मारू द्या, अशा इशारा रुपाली पाटील यांनी दिला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या आज नाशिकमध्ये होत्या. रुपाली पाटील म्हणाल्या, जयकुमार गोरे हे भाजपचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर हे मुख्यमंत्री असताना दत्तक घेतलं होतं. त्यांना नाशिक शहराचा काय विकास केला. आज नाशिक शहराची काय अवस्था आहे, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला. शरद पवार यांनी साताऱ्या जिल्ह्याचा काय विकास केला, हे जनतेला विचारा ना. पावसात भिजलं म्हणजे विकास होत नाही, असं ते म्हणतात. मग तुम्ही भिजा तुम्हाला कुणी अडवलंय. शरद पवार हे देशाचं व्हिजन असलेले नेते आहेत. त्यांच्या नखाचीही सर देवेंद्र फडणवीस किंवा कोणालाही येऊ शकत नाही.
पण, सातत्यानं शरद पवार यांच्याबद्दल बोलायचं. पवार साहेबांनी काय काम केलं हे जयकुमार गोरे आणि जनतेलाही माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मालकाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य केलं असेल, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
शरद पवार हे काही लोकांना सांगून भिजले नाहीत. भाषण सुरू असताना पावसात भिजले. त्यांनी केलेला विकास. त्यांनी साताऱ्यात केलेल्या कामामुळंच उदयनराजे यांच्या विरोधातील उमेदवार निवडून आला. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्यामुळंच निवडून आले, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाविकास आघाडी ही शरद पवार यांच्यामुळं झाली. शरद पवार हे पर्वत आहेत. अशा डोंगरावर उंदीर उड्या मारत असतात. त्यामुळं त्यांना उड्या मारू द्या, अशा इशारा रुपाली पाटील यांनी दिला.
ईडी सरकार कायद्याची प्रक्रिया पार पाडत नाही. खासदार महिलेचा अपमान करणाऱ्यावर काही कारवाई होत नाही. उलट, खोटा इतिहास सांगणाऱ्याला विरोध करणाऱ्यावर कारवाई केली जाते. असं हे शिंदे-फडणवीस सरकार असल्याची टीकाही रुपाली पाटील यांनी केली.