नाशिकः अपेक्षेप्रमाणे नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोन्याने (Gold) अस्मानी झेप घेत वर्षात सर्वाधिक भावाची नोंद नोंदवली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50500 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 65500 रुपये नोंदवले गेले आहेत. यावर 3 टक्के जीएसटी वेगळा असेल, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. शिवाय अजून महिनाभर तरी सोन्याचे भाव चढेच राहतील. त्यानंतर भाव उतरू शकतात, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढला आहे. त्यांच्यात युद्ध होणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महागाईचा उडालेला भडका. यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला अनेकजण प्राधान्य देत असल्याचे समजते. त्यामुळे ही भाववाढ होत आहे.
प्रमुख शहरातील भाव
राज्यात मंगळवारी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50510 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46300 रुपये नोंदवले गेले. पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46750 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50510 रुपये नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46300 रुपये नोंदवले गेले. औरंगाबादमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51050, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46800 रुपये नोंदवले गेले.
अजून भाव वाढणार?
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50500 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर किलोमागे 65500 रुपये नोंदवले गेले आहेत. यावर 3 टक्के जीएसटी वेगळा असेल.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन