दुतोंड्या मारूतीच्या कंबरेपर्यंत पाणी, गणेशोत्सवात धो-धो, नाशिक-शिर्डी परिसराला पावसानं झोडपलं, पहा Photos
नाशिक जिल्ह्यातील दारणा ,कडवा,मुकणे आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रातून 25 हजार 240 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नाशिकः मागील सात-आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिक (Nashik Rain) आणि शिर्डीमध्ये (Shirdi Rain) कालपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली. शहरातील गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. दुतोंडया मारुतीच्या (Dutondya Maruti) कंबरेला पाणी लागलं आहे. गंगापूर धरणातून सध्या अडीच हजार क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू असून दुपारनंतर 4000 क्यूसेस प्रमाणे पाणी सोडले जाईल अशी माहिती आहे. शिर्डीमध्येही मुसळधार पावसामुळे साई बाबांच्या मंदिरात मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आहे.
शिर्डीत साई-प्रसादालयात पाणी
शिर्डी शहरासह परिसरात काल रात्री पासून पावसाने अक्षरक्षः झोडपून काढलय. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाची 115 मिमी नोंद झाली आहे. पावसामुळे शिर्डी शहराला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. नगर – मनमाड महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच साईप्रसादालय, शासकीय विश्रामगृह आणि एमएससीबीच्या कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे..
सकाळपासून बचावकर्य
शिर्डीत अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये देखील पाणी शिरले असून रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे.. राहाता तालुक्यातील अनेक गावातील शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून प्रशासनाने सकाळ पासून मदत कार्य सुरू केलय..
इगतपुरीत ढगफुटी
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला. किमान 100 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. भात शेती आणि काही घरांना बंधाऱ्याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर गावाला जाणारा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला आहे. ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला . शेतीचे खूपच नुकसान झाले आहे.
धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु
नाशिक जिल्ह्यातील दारणा ,कडवा,मुकणे आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रातून 25 हजार 240 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने 76 टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांची हेल्पलाइन
कोरोनाच्या दोन वर्षानंतर सर्वत्र धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्साहात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आलेय. तसेच राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या देखील सोबत राहणार असून, सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. शहरातील चौकाचौकात पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी असणार आहे. काही अत्यावश्यक आणि आपत्कालीन मदतीसाठी 112 आणि 100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय.