कांद्याच्या दरावरुन शेतकरी संतप्त, संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी काय केलं ?
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत, देवळा, उमराणे अशा विविध बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात दररोजची घसरण होत आहे.
नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठाही नाशिकमध्येच आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यातही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अग्रस्थानी असतात. मात्र, उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, वर्षभर साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचा बांध अखेर फुटला आहे. देवळा बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र यावेळी थेट लिलावच बंद पाडले होते, कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी थेट रास्ता रोकोच केला होता. यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना हस्तक्षेप करून वाहतुक सुरळीत करावी लागली होती. एकूणच नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांदा उत्पादक शेतकरी संतापलेले असून कांद्याला मिळणाऱ्या भावावरुन संपूर्ण जिल्ह्यात नाराजी पसरली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठी साठवण केली होती. त्यामध्ये शेतकरी दिवाळीनंतर उन्हाळ कांदा विक्रीसाठी बाजार समितीत नेत असतो.
बाजार समितीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळावा याकरिता दिवाळीनंतर विक्रीसाठी बाहेर काढतात, मात्र यंदाच्या वर्षी कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत, देवळा, उमराणे अशा विविध बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात दररोजची घसरण होत आहे.
त्यामुळे उन्हाळ कांदा बाजार पेठेत विक्रीसाठी आणेपर्यंत होणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून केंद्राने आणि राज्याने कांद्याबाबत धोरण ठरवावे याबाबत आग्रही मागणी केली जात आहे.
उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि प्रहार संघटनेने लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.