Deola IT Raid : देवळ्यामध्ये साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा, 40 वाहनांचा ताफा दाखल, अभिजीत पाटील अडचणीत?
सकाळपासून धाराशिव उद्योग समुहाने राज्यात चालवायला घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांच्या कारभाराची चौकशी आयकर विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. वसाका कारखान्यासमोर सकाळी 40 वाहनांमध्ये दाखल झाला.
मालेगाव : देवळ्याच्या विठेवाडीमधील वसंत दादा साखर कारखान्यावर (Vasant Dada Sugar Factory) आयकर विभागानं छापा टाकला. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील ( Abhijit Patil ) यांनी हा कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतला होता. पंढरपूर, धाराशिव, सोलापूर पाठोपाठ नाशिकमध्येही अभिजीत पाटील यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या मालमत्तांवर छापे पाडण्यात आले. कसमादेचे वैभव असलेल्या ‘वसाका’ साखर कारखान्याच्या कारभाराची सकाळी सहा वाजेपासून आयकर विभागाकडून (Income tax department) चौकशी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद येथील धाराशिव उद्योग समुहाचे अभिजीत पाटील यांनी हा कारखाना चालवायला घेतला आहे.
कारखान्यासमोर सकाळी 40 वाहनांमधून पथक दाखल
राज्यातील सत्ता संघर्षाचा आणि या छाप्याचा संबंध असल्याची जोरदार चर्चा कसमादे परिसरात सुरु आहे. सकाळपासून धाराशिव उद्योग समुहाने राज्यात चालवायला घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांच्या कारभाराची चौकशी आयकर विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. वसाका कारखान्यासमोर सकाळी 40 वाहनांमध्ये दाखल झाला. पथकाने मात्र अद्याप कुठलीही माहिती दिलेली नसली तरी चौकशीतून काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. कारखान्यामध्ये कुणालाही आत येऊ दिले जात नाही. त्यामुळे आतमध्ये नेमकं चाललंय तरी काय याबाबत प्रश्न उपस्थित राहत आहे. चौकशीत नेमकं समोर काय येत हे बघावे लागणार आहे. अभिजीत पाटील यांनी राज्यातील चार कारखाने चालविण्यासाठी घेतले होते.
कोण आहेत अभिजीत पाटील ?
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचे अभिजीत पाटील हे भाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर जाणीवपूर्वक ही चौकशीचा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. सोलापुरातील 20 वर्षांपासून बंद कारखाना यशस्वीपणे चालवून दाखविला. पंढरपुरातील बड्या कारखान्याची निवडणूक लढवून त्यात विजय मिळविला. अभिजीत पाटील हे वाळू ठेकेदार होते. तुकाराम मुंडे यांच्या काळात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तीन महिने तुरुंगात काढावे लागले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी साखर कारखाने चालविण्यासाठी घेतले. शेतकऱ्यांना खुश केले. मात्र, हे त्यांना कसं शक्य झालं हे आयकर विभागाच्या छाप्यातून समोर येईल.