नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीतून विजयी झाल्यानंतर, सत्यजित तांबे यांनी गौप्यस्फोट केलाय. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा रोख हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरच आहे. पटोले यांनीच षडयंत्र रचून बदनामी केली. तसंच चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं सत्यजित तांबे म्हणालेत. तर पटोले यांनीही आपल्याकडेही मसाला असल्याचं सांगून आणखी मोठ्या गौप्यस्फोटाचा इशारा दिलाय. 4 तारखेला गौप्यस्फोट करणार असं सत्यजित तांबे म्हणाले होते. त्याप्रमाणं सत्यजित तांबे यांनी पुराव्यासह प्रदेश काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर राजकीय बॉम्ब टाकले.
पटोले यांच्या सहीचे जे एबी फॉर्म देण्यात आले होते. ते फॉर्म नाशिक पदवीधरचे नव्हतेच. तर औरंगाबाद आणि नागपूर विभागाचे 2 एबी फॉर्म देण्यात आले, हे जाहीर पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांनी दाखवले.
चुकीचे एबी फॉर्म दिल्याचं कळवताच 12 फेब्रुवारीला नवा एबी फॉर्म आला. पण त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचच नाव होतं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये NIL असं लिहिलं होतं. आणि एबी फॉर्मवर माझं नाव लिहू नये म्हणून असं मुद्दाम करण्यात आलं असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला.
सत्यजित तांबे यांच्या आरोपांवर पटोले यांनी बोलण्यास नकार देत, प्रवक्ते बोलतील असं म्हटलंय. मात्र मला उमेदवारी मिळू नये आणि बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठीच षडयंत्र रचल्याचा थेट आरोप सत्यजित तांबे यांनी केला.
आता राहिला प्रश्न उमेदवारी संदर्भातला. तर काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याशी आधीच बोलणं झालं होतं. आणि त्यांनीच डॉ.सुधीर तांबे यांनी अर्ज भरायचा की सत्यजित तांबे यांनी भरायचा हे ठरवावं, असं सांगितलं होतं, असं सत्यजित तांबे यांनी सांगितलंय. उमेदवारीवरुन सर्व ठरलेलं असतानाही, पटोले यांनी आधी स्क्रीप्ट ठरवली होती. असा आरोप सत्यजित तांबे यांनी केलाय.
चुकीचे एबी फॉर्म आणि त्यानंतर अपक्ष अर्ज झाल्यावरही दिल्लीच्या हायकमांडकडे आणि नाना पटोले यांना पाठिंब्यासाठी फोन केला. पण पटोले तांबे कुटुंबीयांची बदनामी करत होते, असं सत्यजित तांबे म्हणालेत.
सत्यजित तांबे यांनी पुढील राजकीय भूमिकाही स्पष्ट केली. आपण कोणत्याही पक्षात जाणार, अपक्ष निवडून आलो. अपक्षच राहणार हे सत्यजित तांबे म्हणालेत.
सत्यजित तांबे यांनी केलेले आरोप स्फोटक आहेत. पुरावे सादर करुन त्यांनी एबी फॉर्मचा घोळ कसा करण्यात आला हेही दाखवलं. आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर काय कारवाई करणार ? हाही सवाल केला. मात्र नाना पटोले काहीही बोलण्यास तयार नाहीत.