Lasalgaon Public Healthcare: लासलगावचे रुग्णालय झाले मोठे; ग्रामीणचे आता उपजिल्हामध्ये रूपांतर, 17 पदेही भरणार
लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय 30 खाटांवरुन 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यामुळे याबाबतीतला मोठा अडसर दूर झाला आहे.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या लासलगाव (Lasalgaon) येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालय (rural hospital) आता मोठे झाले असून, त्याची 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर होणार आहे. या श्रेणीवर्धनास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या रुग्णालयाचा कायापालट होताना दिसतोय. लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असून, याठिकाणी परिसरातील खेड्यांतून सर्वसामान्य नागरिक येतात. पंचक्रोशीतल्या खेड्यातील अनेक नागरिकही विविध उपचार घेण्यासाठी लासलगाव येथे येतात. तसेच येथील लोकसंख्येत सद्यस्थितीत वाढ होत असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
जागेचा अडसर दूर
उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाच्या तयार करण्यापासून ते शासनस्तरावर मंजुरी मिळण्यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांकडून भुजबळ आढावा घेत होते. त्यानंतर या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून, या ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय 30 खाटांवरुन 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यामुळे याबाबतीतला मोठा अडसर दूर झाला आहे.
दर्जेदार सुविधा मिळणार
रुग्णालायासाठी जागेचे अधिग्रहन करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत इतर 14 असा एकूण 17 पदे वाढणार आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपजिल्हा रुग्णालयात पुढील टप्यात सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अतिशय कमी खर्चात या भागातील नागरिकांच्या उपचाराची सोय लवकरच होणार आहे. शिवाय अद्ययावत यंत्रणा येथे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता बड्या उपचारासाठी थेट जिल्हा गाठण्याची गरज पडणार नाही. इतर बातम्याः