गांजा तस्करी प्रकरण : शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याची उचलबांगडी, लक्ष्मी ताठे हिला अटक, तेलंगणा पोलीसांची मोठी कारवाई
Laxmi Tathe Arrested : राज्यात सध्या मद्यविक्री आणि अंमली पदार्थ विक्रीवरुन विरोधकांनी रान पेटवले असताना नाशिकमध्ये मोठी कारवाई झाली आहे. तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिला अटक केली आहे.
राज्यात हिट अँड रनचे प्रकार वाढल्यापासून मद्यविक्री आणि अंमली पदार्थविरोधात मोहिम सुरु आहे. अनेक ठिकाणी कारवाई होत आहे. विरोधकांनी या मुद्यावरुन रान पेटवलेले आहे. त्यातच नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. गांजा तस्करी प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिला अटक केली आहे.
असे समोर आले नाव पुढे
तेलंगाणाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील महिन्यात 190 किलो गांजा पकडला होता. या प्रकरणात महाराष्ट्रच्या बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्कराना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून लक्ष्मी ताठेच नाव पुढे आले होते. एक महिन्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी कारवाई करत लक्ष्मी ताठे हिला अटक केली. पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मी ताठे हिची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने शिवसेनेचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाने दिले आहे.
दामेरा हद्दीत गुन्हा
तेलंगणा राज्यातील दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी पोलिसांनी 190 किलो गांजा पकडला होता. पोलिसांनी या प्रकरणाची पाळंमुळं खोदली. त्यात बीड आणि अहमदनगरच्या दोघांना पकडण्यात यश आले. त्यानंतर याप्रकरणात लक्ष्मी ताठेचे नाव समोर आले. पोलिसांनी संपूर्ण माहिती घेत आता तिच्यावर कारवाई केली.
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघड
यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये नाशिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गांजा तस्करी प्रकरणी लक्ष्मी ताठे आणि अन्य संशयितांना अटक केली होती. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील गोदामावर छापा टाकला होता. नाशिकच्या गुन्हे शाखेने त्यावेळी 34 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 690 किलो गांजा पकडला होता.
ठाकरे गट आक्रमक
लक्ष्मी ताठे प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विलास शिंदे यांनी केली आहे. तेलंगणा पोलीस नाशिकमध्ये येऊन ड्रग्स माफियांवर कारवाई करतात.नाशिक पोलिसांना याबाबत माहिती नव्हती काय ? असा सवाल त्यांनी केला. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात अनेक नाव दाबण्यात आले. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. लक्ष्मी ताठे आणि त्यांचे सहकारी यांची चौकशी केल्यास अनेक मोठे नाव समोर येतील, असा दावा त्यांनी केला. पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.