Sharad Pawar | उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? शरद पवार काय म्हणाले?

| Updated on: Jul 08, 2023 | 4:09 PM

Sharad Pawar On Raj And Uddhav Thackeray Nashik | राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं,अशी इच्छा राज्यातील जनतेकडून बोलून दाखवली जात आहे. आता शरद पवार यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar | उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? शरद पवार काय म्हणाले?
Follow us on

नाशिक | महाराष्ट्रात वर्षभरात 2 राजकीय भूकपं झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत मोठा गट आपल्यासोबत नेला. शिंदेंच्या या बंडामुळे राज्यातील मविआचं सरकार गेलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारला एक वर्ष झालं तितक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड पुकारलं. अजित पवार यांच्यासह अनेक नेते सत्तेत सामील झाले. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली जात आहे.

मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात 6 जुलै रोजी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर पानसे शिवतिर्थावर आणि राऊत मातोश्रीवर गेले. या राऊत-पानसे भेटीमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली.

दरम्यान आता शरद पवार यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत आपलं मत मांडलं आहे. ठाकरे बंधू एकत्र यावं असं वाटतं का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर पवारांनी अवघ्या 5 शब्दात उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे-राज ठाकरे दोघे एकत्र आले तर आनंद आहे”, असं उत्तर पवारांनी दिलं. पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा पवारांचे निष्ठावंत राहिलेल्या छगन भुजबळ यांच्या नाशकात आहे.

छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार

छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला. भुजबळ यांनी त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून भुजबळ हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू होते. भुजबळांची ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा अशी ओळख होती. मात्र शरद पवारांची अजित पवार आणि अनेक राष्ट्रवादी आमदारांनी गेल्या रविवारी 2 जुलै रोजी साथ सोडली. दादांनी उपमुख्यमंत्री तर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर सर्वेसर्वा शरद पवार एक्टीव्ह मोडमध्ये आले. बंडानंतर लोकांमध्ये जाणार असल्याचा निर्णय घेत त्यांनी महाराष्ट्र दोऱ्याची घोषणा केली. या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा ही भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात नाशिक जिल्ह्यातील येवळ्यात होणार आहे. आता या सभेत पवार काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.